चंद्राबाबू नायडू यांच्याकडून नियुक्ती
वृत्तसंस्था/ अमरावती
पी. श्रीनिवास राव यांची आंध्रप्रदेश तेलगू देसम अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तेदेप सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी कृषीमंत्री अत्चनायडू यांच्या जागी गजुवाकाचे आमदार पी. श्रीनिवास राव यांना पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. पी. श्रीनिवास राव हे नवी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास चंद्राबाबू यांनी व्यक्त केला आहे. तर नायडू यांच्या राज्य मंत्रिमंडळात अत्चनायडू यांना कृषी, सहकार, विपणन, पशूपालन आणि डेअरी विकास तसेच मत्स्यपालन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आंध्रप्रदेशात आता रालोआचे सरकार सत्तेवर आहे. चंद्राबाबू नायडू यांनी अलिकडेच 24 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्याची धुरा त्यांनी चौथ्यांदा स्वीकारली आहे.