भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नजिकच्या काळात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सोमवारी पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे राज्य निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची तर अश्विनी वैष्णव यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) विविध राज्यातील निवडणुकांची जबाबदारी आपल्या वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे. महाराष्ट्रासोबतच अन्य राज्यांमधील नियुक्त्याही सोमवारी जाहीर करण्यात आल्या असून त्याची तत्काळ अंमलबजावणी होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हरियाणाचे निवडणूक प्रभारी आणि खासदार विप्लब कुमार देव यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. तसेच पक्षाने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची झारखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पक्षाने जी किशन रेड्डी यांची जम्मू-काश्मीरसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी यासंबंधी पत्रक जारी केले आहे.