टी 20 वर्ल्डकप इतिहासातील भारी स्पेल, 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट
वृत्तसंस्था/ त्रिनिदाद अँड टोबॅगो
येथील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अविश्वसनीय रेकॉर्डची नोंद झाली आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने एक भन्नाट कारनामा करुन दाखवला आहे. पापुआ न्यू गिनीविरुद्ध फर्ग्युसनने चार षटके निर्धाव फेकण्याचा पराक्रम केला आहे. फर्ग्युसनने चार षटके निर्धाव टाकत तीन विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, टी 20 क्रिकेटमधील हा भारी स्पेल ठरला आहे.
टी 20 वर्ल्डकपमध्ये क गटातील शेवटचा साखळी सामना न्यूझीलंड व पापुआ न्यू गिनी यांच्यात झाला. या सामन्यात गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज फर्ग्युसनने इतिहास रचला. फर्ग्युसनने 4 षटकांच्या स्पेलमध्ये एकही धाव खर्च न करता 3 विकेट घेतल्या. त्याने पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. कोणत्याही गोलंदाजाने टी 20 क्रिकेटमध्ये आपल्या षटकांचा कोटा पूर्ण करणे आणि एकही धाव न देता विकेट घेणे हे आश्चर्यकारक आहे. पण, न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने ही किमया करुन दाखवली आहे. पापुआविरुद्ध सामन्यात त्याने ही कामगिरी केली. टी 20 वर्ल्डकपमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे, तर आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये असा कारनामा दुसऱ्यांदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये कॅनडाच्या साद बिन जाफरने अशी कामगिरी केली होती.
न्यूझीलंडचा दणदणीत विजय
प्रथम फलंदाजी करताना पापुआचा संघ 19.4 षटकांत 78 धावांवर ऑलआऊट झाला. पापुआकडून चार्ल्स आमनीने सर्वाधिक 17 धावा केल्या तर इतर फलंदाज किवीज गोलंदाजासमोर सपशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून फर्ग्युसनने 3 तर साऊदी, बोल्ट व इश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले. यानंतर विजयासाठीचे 79 धावांचे लक्ष्य किवीज संघाने 12.2 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 35 धावा केल्या तर केन विल्यम्सनन 18 धावांवर नाबाद राहिला. डॅरेल मिचेलने नाबाद 19 धावांचे योगदान दिले. या विजयासह किवीज संघाने आपला विश्वचषकातील शेवट गोड केला.