अफगाण खेळाडू व चाहत्यांचे जंगी सेलिब्रेशन
वृत्तसंस्था/ सेंट व्हिन्सेंट, काबूल
आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत यंदाच्या स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. सुपर-8 मधील सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला आहे. भारतात झालेल्या 2023 च्या वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने एकतर्फी खेळी खेळून अफगाणिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला होता. अवघ्या आठ महिन्यात विश्वचषक स्पर्धेतच ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अफगाणिस्तानने बदला घेतला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्या संघाला पराभूत केल्यानंतर जगभरातून अफगाण संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच सर्व खेळाडू, कोचिंग स्टाफ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे, अफगाण संघाच्या विजयाचा जल्लोष अफगाणिस्तानमध्ये जोरदार करण्यात आला. अफगाण क्रिकेट बोर्डाने चाहत्यांचे काही फोटो व्हायरल केले आहेत. चाहते घराबाहेर पडून रस्त्यावर फटाके फोडताना दिसत आहेत.