बघता बघता ही स्पर्धा शेवटाकडे येऊन ठेपली आहे. या विश्वचषक स्पर्धेतील उलटफेर पाहून क्रिकेटप्रेमी खऱ्या अर्थाने चकरावलेत. कधी यजमान अमेरिका व विंडीजची घोडदौड बघायला मिळाली तर कधी ऑस्ट्रेलिया निश्चित उपांत्य फेरीत जाणार, असे संकेत मिळू लागले तर इंग्लंड उपांत्य फेरीत पोचणार की नाही, याबद्दल साशंकता होती. गंमत बघा, ज्या विंडीजला अपेक्षा होती उपांत्य फेरीची त्याला काल भगदाड पाडले ते साऊथ आफ्रिकेने. जो या स्पर्धेचा फेवरेट मानला जात होता त्याला उपांत्य फेरीच्या तिकिटासाठी अक्षरश: भीक मागावी लागत आहे. (आज ते चित्र कदाचित स्पष्ट झालेले असेल)
दुसरीकडे इंग्लंडने सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले. बघता बघता उपांत्य फेरीचे तिकीट त्यांनी आपल्या खिशात कधी टाकले हे क्रिकेटप्रेमींना कळलंच नाही. दुसरीकडे अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या. एवढी गुंतागुंत कुठल्याही रहस्यमय चित्रपटात बघायला मिळत नाही, तेवढी या टी-20 विश्वचषकात बघायला मिळाली. एकाच वेळी यजमान अमेरिका व विंडीजमध्ये झालेली स्पर्धेची सुऊवात. अमेरिकेत एक अध्याय संपला. त्या अध्यायात खेळपट्टीच्या नावाने बरीच बोटं मोडली गेली तर काही संघांनी अमेरिकेत पाऊसही मोजला.
दुसऱ्या अध्यायात मात्र सगळ्यांचीच विंडीजमध्ये सत्वपरीक्षा झाली. विंडीजला आपण शंभर टक्के उपांत्य फेरीत पोहोचू असं वाटत होतं. परंतु घडलं मात्र काही वेगळंच. सर व्हिव रिचर्ड्स, अँटी रॉबर्ट्स ही मंडळी निराश झाली असतील. ऑस्ट्रेलियाला दे धक्का देत अफगाणिस्तानाने इतिहास घडवला. त्यांच्या मायदेशातील क्रिकेटप्रेमींनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता खरी गुंतागुंत इथेच सुरू झाली आहे. जर भारताने आज ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि दुसरीकडे अफगाणिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर मात्र अफगाणिस्तानचं उपांत्य फेरीचे तिकीट कन्फर्म होईल. एकंदरीत काय तर या स्पर्धेत बलवान म्हणवणारे देश पूर्णत: निराशेच्या गर्तेत सापडले आहेत. या पूर्ण विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वार्धात गोलंदाज प्रभावी ठरले होते. उत्तरार्धात एखाद दुसरा सामना सोडला तर मात्र फलंदाजांनी सरशी केली आहे. जिथे ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, न्यूझीलंड हे या स्पर्धेचे प्रमुख दावेदार होते, तिथे मात्र या देशांनी सपशेल शरणागती पत्करली. येणाऱ्या दोन-चार दिवसात कुठला संघ आणखी कुठल्या संघाला धक्का देतोय आणि या स्पर्धेवर वर्चस्व गाजवतोय हे बघणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे. हा लेख वाचत असताना उपांत्य फेरीचे तिकीट मात्र कन्फर्म होतील. जर ऑस्ट्रेलियाची दांडी गुल झाली तर मात्र तो या स्पर्धेचा मोठा सेटबॅक असेल. बघायचं नेमकं काय घडतंय ते. तूर्तास तरी भारतीय संघांला शुभेच्छा!