चीनकडून ऐतिहासिक कामगिरी : 2030 पर्यंत चंद्रावर माणूस पाठविण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे मून मिशन चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीसह पृथ्वीवर पोहोचले आहे. याचबरोबर चंद्राच्या सर्वाधिक अंधार असलेल्या हिस्स्यातून मातीचे नमुने आणणारा चीन पहिला देश ठरला आहे. चिनी नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनचे ‘चैंग ई-6 लँडर’ 53 दिवसांनी कॅप्सूलमधील नमुन्यासह पृथ्वीवर पोहोचला आहे.
चीनने 3 मे रोजी चैंग ई-6 मिशन प्रक्षेपित केली होती. या प्रोबचे लक्ष्य चंद्राच्या सर्वात दुर्गम (जेथे काळोख असतो) हिस्स्यात जात नमुने गोळा करत पृथ्वीवर पाठविणे होते. चीनने 2030 पर्यंत चंद्रावर माणूस पाठविण्याचे लक्ष्य बाळगले आहे. हे मिशन त्याच लक्ष्याचा हिस्सा आहे. आतापर्यंत चंद्रावर पोहोचलेल्या सर्व 10 लूनर मिशन्स हे नजीकच्या हिस्स्यावरच पोहोचले आहेत. यात भारत आणि अमेरिका देखील सामील आहे. अशास्थितीत चंद्राच्या फार साइडवरून मातीचे नमुने आणत चीनने अंतराळशर्यतीत अमेरिकेसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
चैंग ई-6 चे री-एंट्री मॉड्यूल चीनच्या उत्तर भागात मंगळवारी सकाळी 11.30 वाजता उतरले आहे. यानंतर एक पथक काही मिनिटांच्या आत मॉड्यूलपर्यंत पोहोचले. या मोहिमेचे यश चीनच्या स्वप्नाला साकार करण्यास मैलाचा दगड ठरणार आहे. याच्या माध्यमातून चीन अंतराळशक्ती होण्यासमीप पोहोचला असल्याचे उद्गार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी काढले आहेत.
चैंग ई-6 मिशन स्वत:सोबत चंद्राच्या पृष्ठभागावरील 2 किलो माती घेऊन परतले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने जमविण्यासाठी ड्रिल आणि रोबोटिक आर्मचा वापर करण्यात आला. याद्वारे चंद्रावर असलेल्या 4 अब्ज वर्षे जुन्या क्रेटरमधून माती काढण्यात आली. यानंतर मातीला एका कॅप्सूलमध्ये भरून री-एंट्री व्हीकलमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. चीनचे वैज्ञानिक आता या मातीच्या नमुन्यांवर संशोधन करणार आहेत. यादरम्यान पृथ्वी आणि सौरमंडळाच्या निर्मितीवरून अध्ययनही केले जाईल.