बसप लढविणार विधानसभेच्या 37 जागा : राज्यात लवकरच होणार निवडणूक
वृत्तसंस्था /चंदीगड
हरियाणात लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या इंडियन नॅशनल लोकदलने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. चालू वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आयएनएलडी आणि बहुजन समाज पक्षादरम्यान आघाडी झाली आहे. या आघाडीच्या अंतर्गत आगामी विधानसभा निवडणुकीत आयएनएलडी 53 तर बसप 37 जागांवर निवडणूक लढविणार आहे.
आयएनएलडी आणि बसप यांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर अभय चौताला यांना मुख्यमंत्री केले जाणार आहे. आघाडी अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी चंदीगड येथे या आघाडीची औपचारिक घोषणा केली आहे. आयएनएलडी आणि बसप यांच्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अभय चौताला यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
आयएनएलडीने स्वत:चा गमावलेला राजकीय प्रभाव पुन्हा मिळविण्यासाठी बसपसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अभय चौताला यांनी मागील आठवड्यातच बसप सर्वेसर्वा मायावती यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीवरून आमचे संयुक्त घोषणापत्र असेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी राखीव पदे भरली जातील. तर जो कोटा संपुष्टात आणला गेला आहे, तो पुन्हा लागू करण्यात येईल असे अभय चौताला यांनी म्हटले होते.
आघाडीचा इतिहास
हरियाणात बसप आणि आयएनएलडी यांच्यात तिसऱ्यांदा आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांनी सर्वप्रथम 1996 च्या लोकसभा निवडणुकीकरता आघाडी केली होती. तेव्हा हरियाणाच्या 10 लोकसभा जागांपैकी 7 ठिकाणी आयएनएलडी आणि बसपने 3 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्या निवडणुकीत बसपचा एक तर आयएनएलडीचे 4 उमेदवार विजयी झाले होते. यांतर 2019 मध्ये आयएनएलडी आणि बसपने मिळून निवडणूक लढविली होती. आता पुन्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.
राज्यात 20 टक्के दलितांचे प्रमाण
2011 च्या जनगणनेनुसार राज्याच्या लोकसंख्येत दलितांचे प्रमाण सुमारे 20 टक्के आहे, परंतु राज्यात या समुदायाचे नेतृत्व करणारा प्रभावी नेता नाही. दुसरीकडे राज्यात सर्वात मोठा जातसमुदाय म्हणून जाट समुदायाची ओळख आहे. जाटांची लोकसंख्येतील हिस्सेदारी सुमारे 27 टक्के आहे. हा समुदाय 90 पैकी 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरत असतो. राज्यात आतापर्यंत जाट समुदायाचे नेतेच अधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहिले आहेत.
भाजपकडून प्रतिक्रिया
बसप आणि आयएनएलडीच्या आघाडीबद्दल बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडौली यांनी दोन्ही पक्षांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. हरियाणाची जनता या आघाडीला कितपत स्वीकारेल हे येणारा काळच सांगणार आहे. आम्ही देखील जनतेदरम्यान जाणार आहोत. राज्यात इंडिया आघाडी देखील आहे. राज्याच्या जनतेला ज्या पक्षाचे धोरण आणि विचारसरणी योग्य वाटेल, त्यालाच सत्तेचा आशीर्वाद मिळणार असल्याचे बडौली यांनी म्हटले आहे.