फ्रान्सची प्राचीन तलवार 1300 वर्षांनी अचानक गायब झाली आहे. एक्सकॅलिबर नावाच्या प्राचीन तलवारीला जगातील सर्वाधिक धार आणि कधीच न नष्ट होणारी तलवार मानले गेले होते. ही तलवार 1300 वर्षांपेक्षा अधिक काळापासून एका दगडात रोवण्यात आली होती. तलवार दगडातून कुणी काढली याची कुठलीच माहिती सध्या पोलिसांकडे नाही. ही तलवार जमिनीपासून खूप अधिक उंचीवर असल्याने ती कशाप्रकारे काढली गेली असावी असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिसांनी याला चोरी मानत तपास सुरु केला आहे. ही तलवार एका वारमध्ये विशाल दगडांनाही तोडण्यास सक्षम होती, असे बोलले जाते. या डूरंडल तलवारीला लोकप्रिय स्वरुपात फ्रेंच एक्सकॅलिबर नावाने देखील ओळखले जाते. राजा आर्थरने या तलवारीला दगडातून बाहेर काढले होते. वदंतेनुसार आठव्या शतकात एका देवदूताने रोमन सम्राट शारलेमेनला ही तलवार दिली होती. 11 व्या शतकातील एक कविता या तलवारीच्या जादुई क्षमतेचे वर्णन करते. जी फ्रेंच साहित्यात अत्यंत लोकप्रिय आहे. ‘द साँग ऑफ रोलँड’ शीर्षक असलेल्या कवितेची एक प्रत ऑक्सफोर्डमध्ये बोडलियन लायब्रेरीत ठेवण्यात आली आहे.
शहराचे मुख्य आकर्षण
जादुई तलवार आणि त्याच्याशी निगडित कहाण्या फ्रान्सच्या रोकॅमडौर शहराच्या मुख्य आकर्षणांपैकी एक होत्या. या तलवारीविषयी शहरात अनेक कहाण्या प्रचलित आहेत. यातील सर्वाधिक प्रचलित कहाणी म्हणजे राजा शारलेमेनने स्वत:चा बहादूर सैनिक रोलँडला ही तलवार प्रदान केली होती. युद्धात जखमी झाल्याने आणि स्वत:चा मृत्यू निश्चित पाहून रोलँडने ही तलवार नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून शत्रूला त्याचा वापर करता येऊ नये. हताशेत त्याने तलवार हवेत फेकली आणि ती एका दगडात जाऊन रुतून बसल्याची कहाणी आहे. ही तलवार पाहण्यासाठी देशविदेशातून लोक यायचे आणि याच्या कहाण्या ऐकायचे. ही तलवार गायब झाल्याने स्थानिक लोक चिंताग्रस्त आहे. या तलवारीशी आपली नियती जोडली गेलेली असल्याचे त्यांचे मानणे आहे. 100 फूटापर्यंत चढून तलवार कुणी कशी काढली असावी असा प्रश्न पडला आहे. स्थानिक लोक तलवार गायब झाल्याने अनेक प्रकारच्या चर्चा करत आहेत.