जामीनवर सुटका झाल्यानंतर झाला फुलांचा वर्षाव : सर्वसामान्य नागरिकांना धक्काच
बेळगाव : भ्रूणहत्या व शिशू विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कित्तूर येथील डॉक्टरला जामीन मंजूर झाला असून कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुष्पवृष्टी करून त्याचे स्वागत करण्यात आले आहे. शिशू विक्रीच्या प्रयत्नात असताना माळमारुती पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक केली होती. यामध्ये कित्तूर येथील डॉ. अब्दुल लाडखान याचाही समावेश होता. मूळात तो डॉक्टर आहे की नाही याची पडताळणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
तिगडोळीजवळील शेतवडीत गर्भपातानंतर त्याने पुरलेले तीन अर्भक आरोग्य विभाग व पोलिसांनी जप्त केले होते. अशी पार्श्वभूमी असलेल्या अब्दुल लाडखानला जामीन मिळाल्यानंतर पुष्पवृष्टी करून त्याचा स्वागत करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा व सर्वसामान्य नागरिकांना धक्काच बसला आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर शनिवारी डॉक्टर कित्तूरमध्ये पोहोचला. त्यावेळी भलामोठा हार घालून त्याचे स्वागत करण्यात आले. काही जणांनी त्याच्यावर फुलांचा वर्षावही केला. ‘किंग इज बॅक’ या नावाने डॉक्टराच्या स्वागताचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. केवळ माळमारुतीत नव्हे तर कित्तूर पोलीस स्थानकातही त्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे.