सावंतवाडी । प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात आपले वर्चस्व ठेवण्याच्या दृष्टीने आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने सिंधुदुर्गात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघांपकी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व ठेवण्याच्या दृष्टीने पक्षाने पावले उचलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत हे उद्या रविवारी सावंतवाडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी तसेच महाविकास आघाडीतील काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेटीला जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेने या मतदारसंघाकडे आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मतदार संघात संभाव्य विधानसभेचा उमेदवार कोण असावा या दृष्टीने चाचणी सुरू आहे. मात्र स्थानिकाला उमेदवारी द्यावी या दृष्टीने शिवसैनिकांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे. स्थानिक उमेदवार नेमका कोण असावा यासाठी पक्षश्रेष्टींनीं शोध मोहीम सुरू केली आहे. जवळपास पाच जण या मतदारसंघात स्थानिक उमेदवार इच्छुक आहेत आणि तशी नावेही पक्षासाठी पाठवण्यात आली आहेत. नेहमीप्रमाणे मुंबई येथून ठाकरे सेना उमेदवार पाठवणार का की स्थानिक इच्छुकांना संधी मिळणार हे आता पाहावे लागेल. श्री राऊत सावंतवाडीच्या दौऱ्यावर येत आहेत नेमके ते सावंतवाडी मतदारसंघाच्या एकंदरीत पुढील राजकीय नीती बबत काय धोरण घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. रविवारच्या दौऱ्यात श्री. राऊत सावंतवाडीत पत्रकार परिषद घेणार आहेत तशी पत्रकार परिषद त्यांनी दोन दिवस अगोदरच निश्चित केली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते नेमका कोणता राजकीय बॉम्ब गोळा टाकणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून आहे . उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने युवा रचना आखली आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या शिक्षण खात्यातील कारभारावर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीने आता या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.