काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील प्रकार
बेळगाव : घरात कोणी नसताना एका नराधमाने मतिमंद तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. बुधवारी काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ही घटना घडली असून पोलिसांनी त्या नराधमाला ताब्यात घेतले आहे. सुमारे 20 वर्षीय मतिमंद तरुणीचे कुटुंबीय शेताला गेले होते. हीच संधी साधून सुमारे 27 वर्षीय तरुणाने त्यांच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. या प्रकारावेळी तरुणीने आरडाओरड केली. त्यावेळी तिचे काका घरात धावून गेले. काकाने संबंधित तरुणाला चोप दिला. गल्लीतील लोक जमा होताच त्या तरुणाने चक्कर येऊन पडल्याचे नाटक करीत तेथून पलायन केले. तरुणीचे कुटुंबीय तिला घेऊन काकती पोलीस स्थानकात दाखल झाले.
रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी काकती पोलीस स्थानकाला भेट देऊन या घटनेसंबंधी माहिती घेतली आहे. या घटनेची माहिती समजताच गावातील महिलांनीही पोलीस स्थानकाला जाण्याचा निर्णय घेतला. मतिमंद मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अद्दल घडवावी, अशी मागणी करण्यासाठी महिला पोलीस स्थानकात जाणार होत्या. पण पोलिसांनी त्यांना अडविले. काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम. पुढील तपास करीत आहेत. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.