युक्रेनने दिला सर्वात मोठा झटका : पुतीन यांचे टेन्शन वाढले
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ब्लादिमीर पुतीन यांच्या सैन्याला मोठा झटका बसला आहे. युक्रेनने क्रीमियातील एका बंदरावर रशियन पाणबुडी नष्ट केली आहे. रोस्तोव-ऑन-डॉन या रशियन पाणबुडीवर सेवस्तोपोल बंदराच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर ही पाणबुडी समुद्रात बुडाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
या युद्धात रयिशाच्या काळ्या समुद्रातील नौदलाच्या ताफ्याचा एक तृतीयांश हिस्सा संपुष्टात आला असल्यावचा दावा युक्रेनने केला आहे. युव्रेनचा हा दावा खरा असेल तर रशियाच्या नौदलाचे प्रचंड नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने पाणबुडीवरील हल्ल्यासंबंधी कुठलेच वक्तव्य दिलेले नाही. रोस्तोव-ऑन-डॉनची हानी ही काळ्या समुद्रात रशियाच्या नौदलासाठी कुठलेच ठिकाण सुरक्षित नसल्याचे सिद्ध करते असे युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे. सेवस्तोपोल बंदरावरील हल्ल्यानंतर एक रशियन पाणबुडी काळ्या समुद्राच्या तळाशी विसावल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे.
2014 मध्ये रशियाने युक्रेनचा भूभाग असलेल्या क्रीमियावर कब्जा केला होता. तर मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्यापासून क्रीमियातील रशियाच्या संरक्षण तळांना युक्रेनने लक्ष्य केले आहे.
रोस्तोव-ऑन-डॉन ही पाणबुडी 2014 मध्ये रशियाच्या नौदलाच्या ताफ्यात सामील झाली होती. ही 73.8 मीटर किलो-द्वितीय क्लास पाणबुडी असून यात एकूण 52 जण सामावू शकतात. ही एक डिझेल इलेक्ट्रिक पॉवर पाणबुडी असून ती कॅलिबर क्रूज क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे. कॅलिबर क्षेपणास्त्रांसोबत नौदलाला उद्ध्वस्त करणे युक्रेनच्या सैन्य रणनीतीचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे, कारण रशियाने याच क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनच्या वीज प्रकल्पांसारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत. पाणबुडीवरील हल्ला युक्रेनसाठी मोठा विजय असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.