वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रशियन पथकाला रशियन ध्वजाखाली सहभागी होण्यात निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेत रशियाचे पथक सहभागी होऊ शकले नाही. दरम्यान रशियन अॅथलिटसना त्रयस्थ म्हणून सहभागी होण्याकरिता परवानगी देण्यात आली होती. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाला अॅन्ड्रीव्हा आणि स्नायडेर यांनी पहिले पदक मिळवून दिले.
टेनिस या क्रीडा प्रकारातील महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या सारा इराणी आणि जस्मिन पाओलिनी यांनी अॅन्ड्रीव्हा व स्नायडेर यांचा 2-6, 6-1, 10-7 अशा सेटसमध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. अॅन्ड्रीव्हा आणि स्नायडेर यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युध्दामुळे रशियन पथकावर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बंदी घालण्यात आली होती.