वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गुरूवारी पुरूष हॉकी या क्रीडा प्रकारात भारत आणि स्पेन यांच्यात कास्य पदकासाठी सामना होणार आहे. हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाला मंगळवारच्या उपांत्य सामन्यात जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने कास्यपदक मिळविले होते.
मंगळवारी झालेल्या जर्मनी विरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. भारतीय खेळाडूंनी जर्मनीच्या बचाव फळीवर खेळाच्या पहिल्या 15 मिनीटांच्या कालावधीत चांगलेच दडपण आणले आणि सातव्या मिनीटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रित सिंगने भारताचे खाते उघडले. पण खेळाच्या दुसऱ्या 15 मिनीटांच्या कालावधीत जर्मनीने चांगलीच मुसंडी मारली. शेवटच्या 15 मिनीटांच्या कालावधीत भारताच्या तुलनेत जर्मनीचा खेळ अधिक आक्रमक आणि अचूक झाल्याने भारताला शेवटी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यामध्ये भारताने अनेक पेनल्टी कॉर्नर्स गमविले. या सामन्यात भारताला 10 पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यापैकी केवळ दोन कॉर्नर्सचा लाभ घेता आला. या सामन्यात भारतीय संघातील अमित रोहिदासला खेळता आले नाही. कारण त्याच्यावर एक सामन्याची बंदी घालण्यात आली होती.
गुरूवारी होणाऱ्या कास्यपदासाठीच्या सामन्यात अमित रोहिदासचे भारतीय संघात पुनरागमन होईल. ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 44 वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याची भारतीय हॉकी संघाला यावेळी लाभली होती. पण ती थोडक्यात हुकली. गुरूवारच्या सामन्यात भारताने स्पेनचा पराभव केल्यास त्यांना कास्यपदक मिळेल आणि टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती पहावयास मिळल. भारतीय संघातील ज्येष्ट हॉकीपटू व गोलरक्षक पी.आर.श्रीजेश या स्पर्धेनंतर हॉकी क्षेत्रातून निवृत्त होत आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यातील झालेला पराभव विसरुन आता गुरूवारी होणाऱ्या कास्यपदकाच्या सामन्यावर भारतीय हॉकीपटूंनी आपले अधिक लक्ष केंद्रित करावे, असे मत पी.आर.श्रीजेशने व्यक्त केले आहे. हॉकी मानांकनात स्पेन सध्या आठव्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. मास्को ऑलिम्पिक स्पर्धेत झालेल्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत भारताने स्पेनचा 4-3 अशा गोल फरकाने पराभव केला होता. भारत आणि स्पेन यांच्यात आतापर्यंत 10 सामने झाले असून त्यापैकी भारताने 7 तर स्पेनने 1 सामना जिंकला आहे. उर्वरित दोन सामने बरोबरीत राहिले आहेत.