वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मुंबईतील महाविद्यालयाने केलेल्या हिजाब बंदी आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत ही स्थगिती आहे. मुंबईतील एका खासगी महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना हिजाब, किंवा टोप्या अथवा बॅजेस उपयोगात आणण्यास बंदी घालणारे सर्क्युलर काढले होते. या सर्क्युलर विरोधात या महाविद्यालयातील 3 विद्यार्थिनी न्यायालयात गेल्या होत्या.
या महाविद्यालयात 441 मुस्लीम विद्यार्थिनी आहेत. त्यांच्यापैकी केवळ 3 विद्यार्थिनींनाच हिजाबबंदीवर आक्षेप आहे. इतर मुस्लीम विद्यार्थिनींची कोणतीही तक्रार नाही. विद्यार्थिनीकडे पाहिल्यानंतर तिचा धर्म लक्षात येऊ नये, यासाठी हिजाबबंदीचा निर्णय लागू करण्यात आला होता, असा युक्तीवाद महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला होता. तथापि न्यायालयाने तो मान्य केला नाही.
न्यायालयाकडून प्रश्न
आपण बिंदी किंवा तिलक यावर बंदी घालणार आहात का, असा प्रश्न न्यायालयाने महाविद्यालयाची बाजू मांडणाऱ्या वकीलांना विचारला. तसेच अशा प्रकारचे नियम लागू करु नका, अशी सूचनाही केली. विशिष्ट धर्माची हिजाब अथवा तत्सम चिन्हे रोखली नाहीत, भगव्या शालींवरही बंदी घालता येणार नाही, असे प्रत्युत्तर महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आले. विद्यार्थिनींचा धर्म त्यांच्या नावांवरुन स्पष्ट होत नाही का, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला होता.