वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता येथील शासकीय आ. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या एका महिला डॉक्टरच्या खून प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. संजय रॉय असे त्याचे नाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी त्याचे खरे नाव वेगळे असावे, अशीही चर्चा आहे. या हत्येमुळे कोलकात्यात मोठा तणाव निर्माण झाला असून राज्य सरकारला दखल घ्यावी लागली आहे. खून करण्यापूर्वी या डॉक्टरवर निर्घृण बलात्कारही करण्यात आला आहे.
शुक्रवारी या महिला डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या विश्रांतीगृहात आढळून आला होता. मृतदेहावर गंभीर जखमा होत्या. तसेच तो नग्नावस्थेत होता. या महिला डॉक्टरवर अत्यंत निर्दय पद्धतीने बलात्कार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र, प्रथमत: कोलकाता पोलिसांनी ही आत्महत्या असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे संतापाची लाट उसळली होती. असंख्य नागरीकांनी महाविद्यालयाला घेराव घातला होता आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची दखल सरकारला गांभीर्याने घ्यावी लागली.
भाजपचा राज्य सरकारवर आरोप
हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यामुळेच प्रथम ही आत्महत्या असल्याची घोषणा करण्यात आली. नंतर जनतेचा दबाव वाढल्यामुळे कोलकाता पोलिसांना दखल घ्यावी लागली. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, हे या घटनेवरुन सिद्ध होते, असे प्रतिपादन या पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केले.
खरा आरोपी समोर आणा
या प्रकरणात राज्य सरकारने खरे आरोपी समोर आणावेत, असे आवाहनही अनेक संघटनांनी केले आहे. ही महिला डॉक्टर 31 वर्षांची होती. ती या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आली होती. एका कार्यक्रमाला उपस्थित राहून ती विश्रांतीगृहात परतल्यानंतर तिच्यावर निर्घृण बलात्कार करुन तिची हत्या हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण देशभर गाजत आहे.