जैतापूर-दळे परिसरातील घटना
वार्ताहर/ राजापूर
राजापुर तालुक्यातील जैतापूर-दळे परिसरात शनिवारी पिसाळलेल्या कोल्हय़ाने चावा घेतल्याने सातजण जखमी झाले. दळे सडेवाडी मार्गी तळे, गिरकर वाडी, लासेवाडी येथे हा प्रकार घडला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
सकाळी सव्वा सहा ते आठ यादरम्यान मार्गी तळे येथील दर्शना देविदास भोसले, गिरकर वाडी येथील प्रभाकर जनार्दन गिरकर, धरण वाडी येथील महेंद्र अंकुश लासे, लासेवाडी येथील नयना नारायण तांबे, कला पांडुरंग पाटील, नारायण परशुराम तांबे व बागेत काम करणाऱया एका नेपाळी युवकाला कोह्याने चावा घेत जखमी केले आहे. हे सर्व लोक आपापल्या घराशेजारी कामे करत असतानाच पिसाळलेल्या कोह्याने त्यांच्यावर अचानक हल्ला करत जखमी केल्याने खळबळ उडाली आहे.
वीरेंद्र चव्हाण, नरेश गिरकर, राजेंद्र प्रसाद राऊत आदींनी जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. व्यावसायिक वैभव कुवेस्कर याने याबाबत राजापूर वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक संजय रणधीर, वनपाल सदानंद घाडगे, वनकर्मचारी विजय म्हादये घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटील लक्ष्मीकांत पालकर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा करून जबाब घेण्यात आले.
कोह्याच्या अचानक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाकडून या कोल्हय़ाचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच जखमी ग्रामस्थांना शासनाकडून तत्काळ मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.