‘महाकलामंडल’ला पाठींबा दिल्याने संचालकांत सोशल मीडियावरून एकमेकांवर चिखलफेक
निर्मात्यांच्या सबसिडीसह चित्रपट महामंडळाच्या जागेचा मुद्दा चव्हाटय़ावर
कला क्षेत्रातील अंतर्गत राजकरण सोशल मीडियावर
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक मार्च-एप्रिल 2021 मध्ये होणार आहेत. परंतु आतापासूनच विरोधकांपेक्षा संचालक मंडळातच सवाल जवाबचा टेलर सुरू झाला आहे. एकमेकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न आणि उत्तारांच्या रूपाने चिखलफेक सुरू आहे. महामंडळातील ‘महाकलामंडल‘ स्थापनेचा वाद चव्हाटय़ावर आला आहे. संचालक जाधव यांनी आरोप केल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभासले यांनी सोशल मीडियावरून उत्तर दिले. आता तर जाधव यांच्यासह मुंबईतील काही संचालकही सोशल मीडियावर ऍक्टीव्ह झाले असून त्यांनी प्रश्न विचारणे सुरू केले आहे.
अखिल भारतील मराठी चित्रपट महाकलामंडलची स्थापना 54 वर्षापुर्वीची आहे. सध्या यामध्ये संचालक 14 संचालक आणि 46 हजार सदस्य आहेत. या मंडळाला शासन मान्यतेसह राजमान्यताही आहे. त्यामुळे कलाकारांच्या हितासाठी स्थापन झालेल्या संस्थेला आपले प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा अधिकार आहे. परंतू सध्याचे अध्यक्ष मेघराज राजेभासले यांनी स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ‘महाकलामंडळा’ला पाठींबा देणारी संस्था म्हणून चित्रपट महामंडळाचा वापर केला आहे.
चित्रपट महामंडळानेच चित्रपट व्यवसायाला भरारी दिली. त्यामुळे ही संस्था एखाद्या शिखर संस्थेच्या दावणीला बांधून आपला राजकीय हेतू साध्य करू नये, अशा सूचनाही सोशल मीडियावर केल्या जात आहेत. कलाकारांचे प्रश्न मांडण्यासाठी चित्रपट महामंडळ असताना या नवीन शिखर संस्थेची गरज काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे. अध्यक्षांनी आपल्या चार वर्षाच्या कारकीर्दीत कलाकारांचा व निर्मात्यांच्या सबसिडीचा प्रश्न सोडवला का? कार्यालयाच्या नवीन जागेचे काय झाले. असे अनेक सवाल विचारत तुमच्या दुटप्पी धोरणाला मुंबई, पुणे, कोल्हापूरसह इतर ठिकाणचे सदस्य भिक घालणार नाहीत, असा टोलाही जाधव यांनी अध्यक्षांना लगावला.
महामंडळ कोणाच्या दावणीला बांधू देणार नाही
चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर न करता कोणाच्या जिवावर ‘महाकलामंडल’ संस्थेला पाठींबा दिला. चित्रपट महामंडळांतर्गत सर्व प्रकारचे कलाकार येत असताना, कलाकारांचे प्रश्न सोडवण्याच्या नावावर कोणालाही विश्वासात न घेता सवतासुभा मांडण्याची आवश्यकता काय? कोणाच्या तरी वैयक्तिक फायद्यासाठी चित्रपट महामंडळ कोणाच्या दावणीला बांधू देणार नाही.
-संचालक रणजीत जाधव (अखिल भारतीय चित्रपट महामंडळ)
वैयक्तिकआकसातूनविरोध
शासन दरबारी कलाकारांची एकत्रित नोंद नसल्याने शासनाच्या सूचनेनुसार 125 संस्थांमधील 8 लाख कलाकार एकत्र करून ‘महाकलामंडल’ची स्थापना केली आहे. या संस्थेंतर्गत पडद्या मागच्या कलाकारापासून ते दिग्दर्शक, निर्मात्यापर्यंत सर्वांची एकत्रित नोंद होणार आहे. गेल्या चार महिन्यापासून 8 लाख सभासद एकत्र करण्याचे काम मी केल्याने त्यांनी मला अध्यक्ष केले आहे. या संस्थेअंतर्गत शासनाने कामगार कल्याण मंडळाप्रमाणे कलाकार कल्याण मंडळ स्थापन करून कलाकारांचा आरोग्य विमा काढावा. कलाकारांना शासनाचे कार्ड द्यावे, घरकुल योजना राबवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पण काही लोक वैयक्तिक आकसातून विरोध करीत आहेत.
-अध्यक्ष मेघराज राजेभासले (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)