युवराज बावडेकर ; ‘सावरकर’जवळील भूखंडावरील आरक्षण उठविण्यास भाजपचा विरोध
प्रतिनिधी / सांगली
सावरकर प्रतिष्ठानच्या जवळील आरक्षित भूखंडाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट व स्वच्छ आहे. या भूखंडावर शाळा व क्रिडांगणाचे आरक्षण आहे. ते उठविण्यास भाजपचा विरोधच आहे. दरम्यान या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव महासभेसमोर आल्यास तो चर्चा करुन फेटाळला जाईल अशी माहिती भाजपचे महापालिकेतील गटनेते युवराज बावडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. दरम्यान आरक्षण उठविण्याच्या प्रकारात भाजपच्या कोणाचाही सहभाग नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
महापालिका क्षेत्रातील सांगली शहरातील सर्व्हे नंबर 363/2 या 6600 चौरस मीटर जमिनीवर माध्यमिन शाळेचे आरक्षण आहे. ते उठवून या जागेचा रहिवासी क्षेत्रात समावेश करण्याबाबत शासनाने निर्णय दिला आहे. महापालिका आयुक्तांनी अधिसूचना काढून सदर विषयात सूचना व हरकती मागवल्या आहेत. यावरुन वादंग निर्माण झाले आहे. सावरकर प्रतिष्ठानच्या ट्रस्टींनी आरक्षण उठविण्यास विरोध दर्शवला आहे. तर सर्व पक्षीय कृती समितीनेही याबाबत आक्षेप घेत थेट मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, पालकमंत्री तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. फेर सर्व्हेक्षण तसेच महासभेत निर्णय झाल्याशिवाय आरक्षण उठविण्याबाबत हालचाली करु नयेत अशी मागणी केली आहे.
याबाबत बोलताना भाजपा गटनेते युवराज बावडेकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. बावडेकर म्हणाले, सावरकर प्रतिष्ठानजवळील भूखंड शाळा आणि क्रिडांगणासाठी आरक्षीत आहे. या भूखंडावरील आरक्षण उठविण्यास भाजपचा विरोधच आहे. महासभेसमोर या भूखंडावरील आरक्षण उठविण्यासंदर्भातचा प्रस्ताव आल्यास त्यावर सखोल चर्चा करु. हा प्रस्ताव फेटाळू. भाजप सत्तेच्या काळात असे अनेक प्रस्ताव भाजपने फेटाळले आहेत. पारदर्शक आणि लोकाभिमुक कारभार हाच भाजपचा अजेंडा असल्याने आरक्षण उठविण्याच्या प्रकरणात भाजपमधील कोणाचाही हात नसल्याचेही बावडेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.