एका 22 वर्षीय युवतीने निवडलेले करियर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. तिने वर्कप्लेस म्हणून एका दफनभूमीची निवड केली आहे. ज्या वयात तरुण-तरुणी जीवनात काहीतरी प्राप्त करू इच्छितात, त्या वयात चीनमधील एका युवतीने शांतता अन् समाधानाच्या शोधात दफनभूमीची नोकरी पत्करली आहे. दफनभूमीतील तिच्या कार्यालयात सहसा कुणी येत नाही. एकटे राहण्याचा मला त्रास नाही, परंतु अन्य कार्यालयांमध्ये होणाऱया पॉलिटिक्सबद्दल चीड असल्याचे या युवतीचे म्हणणे आहे.
चीनमध्ये राहणाऱया या मुलीचे आडनाव टॅन आहे. तिने वयाच्या 22 व्या वर्षी पदवी मिळवत एका सेमेट्रीत नोकरी पत्करली आहे. चिनी सोशल मीडियावर ती स्वतःची छायाचित्रे अन् चित्रफिती शेअर करत असते. टॅनचे ऑफिस म्हणजेच दफनभूमी पश्चिम चीनच्या चोंगकिंगमध्ये एका पर्वतीय भागात आहे. हा परिसर अत्यंत आरामदायी असल्याचे तिचे मानणे आहे. तेथे श्वान अन् मांजरांची सोबत तसेच काम करण्यासाठी इंटरनेटची सुविधा मिळत आहे. टॅन स्वतःला ग्रेव्ह कीपर म्हणजेच दफनभूमीची रक्षक म्हणवून घेते. टॅनला हे काम अत्यंत आवडत असल्याने ते सोडण्याचा तिचा विचार नाही.
45 हजार रुपयांचा पगार
दफनभूमीत काम करण्यासाठी टॅनला 4 हजार युआन म्हणजेच 45 हजार रुपयांचा मासिक पगार मिळतो. तिला सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करावे लागते आणि 2 तासांचा लंच बेकही मिळतो. काम अन् जीवनामध्ये संतुलन राखू इच्छित होते आणि दफनभूमीत काम केल्याने ते साध्य होत आहे. येथे ऑफिस अन् स्टाफमधील राजकारण नसल्याचे तिने म्हटले आहे.