नव्या सरकारमध्ये रोमिनाला महत्त्वाची जबाबदारी
वृत्तसंस्था /स्टॉकहोम
स्वीडनच्या नव्या आघाडी सरकारमध्ये 26 वर्षीय नेत्या रोमिना पोरमोतरी यांना पर्यावरणमंत्री करण्यात आले आहे. रोमिना यांना पर्यावरणासारखे महत्त्वाचे मंत्रालया सोपविण्याच्या निर्णयाची मोठी चर्चा होत आहे. हवामान बदल विरोधात आवाज उठविणारी ग्रेटा थनबर्ग देखील स्वीडनचीच नागरिक आहे.
नवे पंतप्रधान उल्फ किस्टर्सन यांनी मंगळवारी मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. स्वीडनमध्ये अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या आघाडीने विजय मिळविला आहे. रोमिना यापूर्वी पक्षाच्या युवा शाखेची अध्यक्ष राहिली आहे.
लिबरल पार्टीची सदस्य
रोमिना अनेक वर्षांपूर्वी लिबरल पार्टीच्या युवा शाखेशी जोडली गेली होती. परंतु नव्या सरकारमध्ये तिला पर्यावरणमंत्री करण्याचा निर्णय काहींना रुचलेला नाही. रोमिनाने या मुद्दय़ावर कधीच काम केले नसल्याने या निर्णयाबद्दल नाराजी आहे. याचबरोबर रोमिना कधीकाळी वर्तमान पंतप्रधान किस्टर्सन यांची मोठी टीकाकार राहिली आहे. पंतप्रधान किस्टर्सन हे डेमोक्रेट्स पार्टीचे सदस्य आहेत. रोमिनाने काही काळापूर्वी डेमोक्रेट्स पार्टीसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शविला होता.
स्थलांतरविरोधी धोरण
स्वीडनमधील आघाडी सरकारची घोषणा झाल्यावर पंतप्रधान किस्टर्सन यांनी सहकाऱयांसोबत झालेला करारही सार्वजनिक केला होता. त्यांनी स्थलांतराच्या विरोधात कठोर धोरण अंमलात आणण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच गुन्हय़ांविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे म्हटले आहे. स्वीडनच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नवे पद निर्माण करण्यात आले आहे. देशात स्थलांतरितांचा ओढा वाल्याने गुन्हय़ांचे प्रमाण वाढले आहे. याचमुळे नागरी सुरक्षा मंत्रालय निर्माण करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.