नौकेतून करावा लागतो प्रवास, गावात बँक अन् मशिद देखील
पाण्यावर तयार करण्यात आलेल्या घरांबद्दल तुम्ही ऐकले असेल, परंतु जलाशयावर वसलेल्या गावाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 1995 मध्ये हॉलिवूडचा चित्रपट ‘वॉटर वर्ल्ड’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक पूर्ण शहर पाण्यावर वसलेले दर्शविण्यात आले होते. अशाच प्रकारची एक वस्ती आफ्रिकेत आहे. ही स्लम बेनिनमध्ये असून तिचे नाव गनवी आहे. याला आफ्रिकेतील व्हेनिसही म्हटले जाते. येथील जलमार्गात सुंदर नौका विहार करत असतात, त्यांना पाहून व्हेनिसमध्ये पोहोचल्यासारखे वाटू लागते, परंतु येथील घरे व्हेनिसपेक्षा खूपच वेगळी आहेत.
गनवी हे आफ्रिकन देश बेनिनमध्ये कोटोनौनजीक नोकोई सरोवरावर वसलेले गाव आहे. बेनिनची राजधानी एबॉमीमध्ये दोन महाल असून तेथे मानवी कवटींवर एक सिंहासन रचल्याचे पाहता येते. गनवी या गात 30 हजारांहून लोकांचे वास्तव्य आहे. हे लोक बांबूने तयार घरांमध्ये राहतात. ही सर्व घरे लाकडाच्या आधारावर टिकलेली आहेत. पाण्यावर वसलेले गाव असले तरीही येथे पिण्यासाठी पाणी मिळणे खूपच अवघड आहे.


येथे हस्तकलेने तयार करण्यात आलेल्या सामग्रीची विक्री होते. तसेच येथे पाण्यावर तरंगणारा बाजार आहे. वसाहतीत जमीन देखील असून तेथे गावातील मुलांसाठी शाळा स्थापन करण्यात आली आहे. येथे एक बँक, पोस्ट ऑफिस, चर्च, मशिदीसह वैद्यकीय सुविधा देखील आहे. तसेच दफनभूमी निर्माण करण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठय़ा प्रमाणात माती विकत आणावी लागते.
मासेमारी मुख्य व्यवसाय
गावातील बहुतांश लोक मासेमारीचे काम करतात. याचबरोबर पर्यटकांमुळे येथे अनेक लोकांना उत्पन्न प्राप्त होते. या क्षेत्रातील मच्छिमार बांबू आणि जाळय़ाद्वारे पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करत मासेमारी करतात. अनेक ग्रामस्थ मैदानी भागांमध्ये जमीन खरेदी करून पशूपालनही करत आहेत. पाण्यावर काही रेस्टॉरंट्स असून त्यात मासे आणि भाताने तयार केलेले खाद्यपदार्थ मिळतात. नौकांवर फळे आणि भाज्या मिळत असतात.