मुलीचा कारस्फोटात मृत्यू ः युक्रेनने स्वतःच्या नागरिकांना केले सतर्क
वृत्तसंस्था / मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अलेक्झेंडर दुगिन यांच्या मुलीचा कार बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. हा स्फोट शनिवारी रात्री उशिरा झाला आहे. दारया दुगिन ही मॉस्कोमध्ये आयोजित एका सांगितिक कार्यक्रमातून घरी परतत असताना हा स्फोट झाला आहे. हा स्फोट कशामुळे झाला आणि यामागे कुणाचा हात होत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरियाचे वडिल अलेक्झेंडर दुगिन हेच खरे टार्गेट होते असे देखील मानले जात आहे. दुगिन यांच्याच हत्येचा कट रचण्यात आला होता. या कारमधून तेच प्रवास करणार होते. परंतु अचानक त्यांनी या कारमध्ये न बसण्याचा निर्णय घेतला होता. ही कार प्रत्यक्षात अलेक्झेंडर यांचीच होती आणि दरिया ही कार चालवत होती. अलेक्झेंडर हे दुसऱया कारमधून प्रवास करत होते. दरियाच्या कारमागूनही ही कार प्रवास करत होती. दरियाच्या कारमध्ये स्फोट होत तिचा मृत्यू झाला आहे. अलेक्झेंडर दुगिन यांना ब्लादिमीर पुतीन यांचा ‘ब्रेन’ म्हटले जाते.
ब्रिटनकडून निर्बंध
रशिया-युक्रेन युद्ध पाहता ब्रिटनने दारया दुगिनच्या विरोधात निर्बंध लादले होते. 20 वर्षीय दारया पेशाने पत्रकार होती. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाला तिचे समर्थन होते. याच्या समर्थनार्थ तिने सोशल मीडियावर अनेक पोस्ट देखील केल्या होत्या.
युद्धाचे सूत्रधार अलेक्झेंडर
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी घेतलेल्या निर्णयामागे अलेक्झेंडर दुगिन यांचीच भूमिका असते असे जागतिक वर्तुळात बोलले जाते. युक्रेनवरील हल्ल्यामागे अलेक्झेंडर यांचाच हात असल्याचे सांगण्यात येते. रशियाने 2014 मध्ये क्रीमियावर कब्जा केला होता. त्यानंतर 2015 मध्ये अमेरिकेने अलेक्झेंडर यांच्यावर निर्बंध लादले होते.
आगीच्या गोळय़ात रुपातंरित कार
कारमध्ये स्फोट रस्त्याच्या मधोमध झाला आहे. स्फोटानंतर ही कार एका आगीच्या गोळय़ात रुपांतरित झाली. या स्फोटानंतर तेथे खळबळ उडाली होती. अलेक्झेंडर तेथेच उपस्थित होते. हा हल्ला युक्रेनने घडवून आणल्याचा दावा युक्रेनच्या डोनेट्स्क प्रांतातील रशियाचे समर्थनप्राप्त कमांडर डेनिस पुशलिन यांनी केला आहे. युक्रेनच्या दहशतवाद्यांनी कारमध्ये हा स्फोट घडवून आणल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका रशियन टेलिग्राम चॅनेलने युक्रेनने सूड उगविण्यासाठी पुतीन यांच्या निकटवर्तीयाच्या मुलीला ठार केल्याचे नमूद केले आहे.