अफगाणिस्तानच्या एका जिल्हय़ावर अहमद मसूद गटाचे नियंत्रण
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याने काढता पाय घेतल्यावर सत्तेवर आलेल्या तालिबानला अहमद मसूदच्या सैन्याने मोठा झटका दिला आहे. अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेजिस्टेंस प्रंट (एनआरएफ) या गटाच्या सदस्यांनी अफगाणिस्तानच्या एका जिल्हय़ावर नियंत्रण मिळविले आहे. बदख्शान प्रांतातील शकाय जिल्हा आता मसूद यांच्या नियंत्रणाखाली आला आहे. शकाय हा जिल्हा ताजिकिस्तानच्या सीमेला लागून आहे. एनआरएफने तालिबानचा जिल्हा गव्हर्नर मावली अक्रमला ताब्यात घेतले आहे.
तालिबानचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूब हा बदख्शान प्रांताच्या दौऱयावर असताना एनआरएफने हे यश मिळविले आहे. अफगाणिस्तानचा बदख्शान प्रांत सामरिकदृष्टय़ा एनआरएफच्या रसदपुरवठय़ासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच प्रांताद्वारे एनआरएफचे सदस्य पंजशीर आणि काबूलच्या उपनगरीय भागापर्यंत पोहोचत असतात. येथील जनतेचा विरोध असल्याने तालिबानला या प्रांतावरील कब्जा कायम ठेवणे अवघड ठरले आहे. सातत्याने होणारी लढाई तालिबानच्या कमकुवत राजवटीसाठी अत्यंत घातक तसेच खर्चिक ठरणार असल्याचे विश्लेषकांचे मानणे आहे.