शोध मोहिमेत सापडले 149 कॅन बॉम्ब, स्फोटके
औरंगाबाद / वृत्तसंस्था
बिहारमधील औरंगाबाद जिल्हय़ात तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. सुरक्षा दलांनी येथे 149 कॅन (बॉटल) बॉम्ब आणि 13 प्रेशर आयईडी जप्त केले आहेत. सदर बॉम्ब आणि स्फोटके नक्षलवाद्यांनी लपवून ठेवल्याचा दावा करण्यात आला असून या कारवाईमुळे त्यांचा मोठा कट उधळला गेला आहे. औरंगाबादच्या मदनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाचरुखिया आणि आसपासच्या जंगलात सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने छापा मोहीम राबवत ही कारवाई केली आहे.
बिहारमध्ये सुरक्षा दलांसोबतच पोलीसही नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई करत आहेत. त्याअंतर्गत शोध मोहीमही राबवली जात असून नक्षलवाद्यांनाही अटक करण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणांकडून डोंगरावरील गुहेत लपवून ठेवलेला आयईडी साठा जप्त करण्यात आला आहे. एएसपी मोहीम मुकेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मोठय़ा प्रमाणात आयईडी आणि स्फोटके जप्त करण्यात आली असल्याचे सांगत सदर स्फोटके बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी निकामी केल्याचे स्पष्ट केले. या स्फोटकांच्या अधिक तपासासाठी शनिवारी आजूबाजूच्या परिसरातही छापेमारी सुरू होती.
यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ल्याचा कट आखला होता, मात्र सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा हा नापाक डाव हाणून पाडला होता. नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली मोठय़ा प्रमाणात बंदूक आणि गोळय़ाही जप्त करण्यात आल्या होत्या. त्यावेळीही सुरक्षा दलांनी आयईडी जप्त करून जंगलात निकामी केली होती.