ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात 386 धावांची आघाडी, कॅरेचे शतक, ग्रीनचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ मेलबर्न
येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत बुधवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत वावरत आहे. या कसोटीतील दोन दिवस बाकी असून यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला डावाचा पराभव टाळण्यासाठी अद्याप 371 धावांची गरज असून दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 1 बाद 15 धावा जमवल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावात आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 8 बाद 575 धावावर घोषित करून दक्षिण आफ्रिकेवर 386 धावांची भक्कम आघाडी मिळवली. दक्षिण आफ्रिकेचा संघ डावाचा मोठा पराभव टाळण्यासाठी झगडत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात वॉर्नरचे द्विशतक, कॅरेचे शतक तसेच स्मिथ, हेड आणि ग्रीन यांची अर्धशतके महत्त्वाची ठरली. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेवर आघाडी मिळवली आहे.
ऑस्ट्रेलियाने 3 बाद 386 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला पण दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नॉर्त्जेने खेळाच्या तिसऱया षटकात हेड आणि वॉर्नर यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. नॉर्त्जेने हेडचा त्रिफळा उडवला. त्याने 55 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 51 धावा जमवल्या. मंगळवारी दुखापतीमुळे निवृत्त झालेला वॉर्नर बुधवारी केवळ एक चेंडू खेळू शकला. नॉर्त्जेने त्याचा त्रिफळा उडवला. शतकी कसोटीमध्ये वॉर्नरने 255 चेंडूत 2 षटकार आणि 16 चौकारासह 200 धावा झळकवल्या. ऑस्ट्रेलियाची स्थिती यावेळी 5 बाद 395 अशी होती. कर्णधार पॅट कमिन्स 4 धावावर झेलबाद झाला तर एन्गिडीने लियॉनला झोंडोकडे झेल देण्यास भाग पाडले त्याने 17 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 25 धावा जमवल्या. ऍलेक्स कॅरे आणि कॅमेरून ग्रीन या जोडीने आठव्या गडय़ासाठी 117 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने आपला डाव 8 बाद 575 धावांवर घोषित केला. कॅरेने 149 चेंडूत 13 चौकारासह 111 धावा झळकवल्या. स्टार्कने 1 षटकारासह नाबाद 10 तर कॅमेरून ग्रीन 5 चौकारासह नाबाद 51 धावा झळकवल्या. कॅरेचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्त्जेने 92 धावात 3, रबाडाने 144 धावात 2 तसेच एन्गिडी आणि जेनसन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
386 धावांनी पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱया डावाला सुरुवात केली पण दुसऱयाच षटकातील तिसऱया चेंडूवर कमिन्सने कर्णधार एल्गारला खाते उघडण्यापूर्वीच कॅरेकरवी झेलबाद केले. द. आफ्रिकेने दिवसअखेर 7 षटकात 1 बाद 15 धावा जमवल्या. इर्वी 7 तर डी. ब्रुयेन 6 धावावर खेळत आहेत. कमिन्स एक बळी घेतला. या मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 4 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवली जाणार असून दुखापतीमुळे या कसोटीत वेगवान गोलंदाज स्टार्क खेळण्याची शक्यता कमी आहे.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका प. डाव सर्व बाद 189, ऑस्ट्रेलिया प. डाव 8 बाद 575 डाव घोषित (वॉर्नर 200, कॅरे 111, स्मिथ 85, हेड 51, ग्रीन नाबाद 51, लियॉन 25, नॉर्त्जे 3-92, रबाडा 2-144, एन्गिडी 1-98, जेनसन 1-89), द. आफ्रिका दु. डाव 7 षटकात 1 बाद 15 (इर्वी खेळत आहे 7, डी. ब्रुयेन खेळत आहे 6, एल्गार 0, कमिन्स 1-0).