थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आहे. याचे प्रत्यंत्तर उत्तराखंडमधील एका युवकाने बाईक खरेदी करताना आणून दिले. 50 हजार रुपयांची दुचाकी खरेदी करण्यासाठी त्याने अक्षरशः दहा दहा रुपयांची 5 हजार नाणी नेली होती. अगदी लहानपणापासून त्याला आईवडिलांनी नाण्यांच्या स्वरुपात बचत करण्याची सवय लावली होती. वयाच्या तिसऱया वर्षांपासून 28 व्या वर्षांपर्यंत 25 वर्षांच्या काळात त्याने असंख्य नाणी अशाप्रकारे जमा केली. त्यातली दहा रुपयांची 5 हजार नाणी त्याने बाईक विकत घेण्यासाठी वापरली आहेत. मात्र ही नाणी मोजता मोजता बाईक शोरुमच्या कर्मचाऱयांची पुरेवाट झाली. ही नाणे गणती सुरु असताना एका कर्मचाऱयाने त्याची व्हिडिओग्रॉफी केली, जी आता प्रसारीत होत आहे.
या युवकाने अशाप्रकारे नाणे देऊन स्कूटीची खरेदी केली आहे. अशाप्रकारे दुचाकी खरेदी करणारा हा भारतातील पहिलाच ग्राहक असावा असे अनुमान आहे. त्याने दोन पोत्यांमध्ये भरून ही नाणी आणली होती. त्याची ही खरेदी करण्याची पद्धत पाहून शोरुमच्या कर्मचाऱयांनी सुरुवातील अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला. या युवकाचे नाव समजलेले नसले तरी त्याने केलेल्या या विक्रमाची यूटय़ूबवर बरीच चर्चा आहे. या व्हिडिओग्रॉफीला असंख्य लाईक्स मिळालेले आहेत. या युवकाने कोणतेही कर्ज न काढता स्वतःच्या नाणे बचतीतून ही स्कूटी खरेदी केल्यामुळे तो पंचक्रोशीत मोठय़ाच चर्चेचा विषय बनला आहे.
यापूर्वी बीएमडब्ल्यू कारची खरेदी एका सणकी युवकाने नाणे मोजून केल्याचे उदाहरण घडले आहे. त्यावेळी आसामच्या एका व्यक्तीने आपली 30 वर्षांच्या सेवाकाळात केलेली नाणे बचत अशाप्रकारे बीएमडब्ल्यू खरेदी करण्यासाठी उपयोगात आणली आहे. त्यावेळीही सगळी नाणी मोजण्यासाठी बराच वेळ लागला होता. त्यावेळी शोरूममधील 30 कर्मचाऱयांनी नाणी मोजली होती.