साखळी स्फोटांनी दहशत : काबूल हादरले
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या साखळी स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. हजरत झकेरिया मशिदीजवळ हा स्फोट झाला. मशिदीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. लोक मशिदीत असताना पहिला स्फोट झाला. त्यानंतर काही वेळातच उत्तरेकडील शहर मझर-इ-शरिफ येथे एका मिनी व्हॅनमध्ये झालेल्या तीन बॉम्बस्फोटात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती काबूल पोलीस कमांडरनी दिली. या स्फोटानंतर लोकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले होते. गुरुवारपर्यंत या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संस्थेने स्वीकारलेली नव्हती.
अफगाणिस्तानात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटात 16 जण ठार झाले असून 32 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या साखळी स्फोटांनी राजधानी काबूल आणि मझर-इ-शरिफ ही शहरे हादरली. तालिबानचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आयएस या दहशतवादी संघटनेने हे स्फोट घडवल्याचा संशय आहे. पहिला स्फोट हजरत-इ-झकेरिया या मशिदीमध्ये झाला. येथे पाच जण ठार तर, 17 जण जखमी झाले. त्यानंतर तासाभरातच मझर-इ-शरिफ येथे वेगवेगळय़ा तीन व्हॅनमध्ये तीन स्फोट झाले. त्यात 11 ठार आणि 15 जण जखमी झाल्याचे पोलीस प्रवक्ते मोहम्मद असिफ वाझिरी यांनी सांगितले. व्हॅनमधून वाहतूक सुरू असताना प्रवाशांना लक्ष्य करूनच हे स्फोट घडवण्यात आले.