दर 5 मिनिटांनी होते उलटी
जगात प्रत्येक आई स्वतःच्या मुलाच्या उत्तम आरोग्याची कामना करते. कुठलीही आई स्वतःच्या मुलाला कुठल्याही प्रकारची समस्या होऊ नये यासाठी झटत असते. परंतु मुलाला जेव्हा एखादा आजार होतो, तेव्हा त्या आईसाठी ते सहन करण्यापलिकडचे असते. स्वतःच्या मुलाला त्रासात पाहून ती देखील त्रस्त होते. अशा स्थितीत एखाद्या मुलाला कधीच बरा न होणारा आजार झाल्यास त्याच्या आईवर काय ओढवेल याचा विचार करा.
सोशल मीडियावर एका आईने स्वतःच्या अशाच मुलाची स्टोरी शेअर केली ओ. स्कॉटलंडच्या एडिनबर्गमध्ये राहणाऱया ज्युलीच्या मुलाला सिक्लिकल वोमेटिंग सिंड्रोम आहे. या सिंड्रोममध्ये दर 5 मिनिटांनी उलटी होऊ लागते. स्वतःच्या या स्थितीमुळे तिचा मुलगा जॉश देखील त्रस्त झाला आहे. तो वारंवार स्वतःच्या आईला एकच प्रश्न विचारतो. ‘माझी अशी स्थिती का आहे, बाकीची मुले सामान्य जीवन जगत असताना माझीच स्थिती इतकी खराब का’ असे तो विचारत असतो.
दर 6 आठवडय़ांनी होतो ऍडमिट
स्वतःच्या या दुर्लभ आजारामुळे जॉशला दर 6 आठवडय़ांनी रुग्णालयात दाखल करावे लागते. यादरम्यान त्याला अनेक प्रकारची औषधे दिली जातात. उलटी करताना जॉशला रक्ताच्या उलटय़ा देखील होऊ लागतात. तसेच त्याला बोलतानाही मोठा त्रास होत असतो. प्रत्यक्षात त्याच्या तोंडात मोठय़ा प्रमाणात सलाइवा तयार होते. अशा स्थितीत लाळेमुळे तो बोलू शकत नाही. जॉशच्या या सिंड्रोमचे कारण डॉक्टरांनाही समजलेले नाही. मला माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मोठी चिंता असल्याचे ज्युली यांनी म्हटले आहे.
नाही कुठला उपचार
सिक्लिकल वोमेटिंग सिंड्रोमचे कारण आणि उपचार अद्याप समोर आलेला नाही. जॉशला अखेर नेमके काय होतेय हे ज्युलीला पूर्वी समजत नव्हते. जॉशला डॉक्टरांकडे नेल्यावर तिला आजाराबद्दल कळले. परंतु या आजारावर कुठलाच उपचार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जॉशला विविध प्रकारची औषधे दिली जातात. यातील एखादे औषध प्रभावी ठरेल अशी अपेक्षा यामागे असते. तोंडात लाळ तयार होत असल्याने तो फारसे बोलू शकत नाही. यामुळे तो स्वतःचे विचार लिहूनच मांडत असतो.