Tarun Bharat

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेची शानदार सांगता

Advertisements

अलेक्झांडर स्टेडियमवरील सांगता सोहळय़ात व्हिक्टोरिया गव्हर्नरकडे राष्ट्रकुल ध्वज सुपूर्द

बर्मिंगहम / वृत्तसंस्था

मागील 11 दिवसांपासून एकापेक्षा एक दिग्गज देशांचा सहभाग असलेल्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेची मंगळवारी शाही सांगता झाली. अलेक्झांडर स्टेडियमवर आयोजित सांगता सोहळय़ाच्या माध्यमातून बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेचा समारोप झाल्याची घोषणा करण्यात आली. तसेच, यावेळी ऑस्ट्रेलियातील स्टेट ऑफ व्हिक्टोरियाच्या गव्हर्नरकडे राष्ट्रकुल ध्वज सुपूर्द करण्यात आला. पुढील राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये ऑस्ट्रेलियात होत आहे.

 अर्ल ऑफ वेसेक्सचे प्रिन्स एडवर्ड यांनी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेचा समारोप झाल्याची अधिकृत घोषणा केली. बर्मिंगहम 2022 ही आजवरची सर्वात मोठी राष्ट्रकुल स्पर्धा ठरली असून यात सर्वाधिक इव्हेंट्स संपन्न झाले. मागील 11 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 5 हजारपेक्षा अधिक ऍथलिट्सनी सहभाग घेतला.

सुवर्णपदक विजेता टेटेपटू अचंथा शरथ कमल व महिला मुष्टियोद्धा निखत झरीन यांनी सांगता सोहळय़ातील पथसंचलनात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारताने 22 सुवर्ण, 15 रौप्य व 23 कांस्यपदकांसह एकूण 61 पदके जिंकली आणि स्पर्धेच्या पदकतालिकेत चौथे स्थान प्राप्त केले.

राष्ट्रकुल 2022 सुवर्णजेते पीव्ही सिंधू व पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ात ध्वजधारक होते. भारतासाठी यंदाचे राष्ट्रकुल उत्तम यश मिळवून देणारे ठरले. भारताने मिळवलेल्या 61 पदकात कुस्तीत 6 सुवर्णसह सर्वाधिक 12 पदके तर वेटलिफ्ंिटगमधील 10 पदकांचा समावेश राहिला. पुरुष हॉकी संघाने रौप्य जिंकले. हेच रौप्य भारतासाठी यंदाच्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतील शेवटचे पदक ठरले.

ऑस्ट्रेलियाने 178 पदके (67 सुवर्ण, 57 रौप्य, 54 कांस्य) जिंकत पदकतालिकेत अव्वलस्थान प्राप्त केले तर यजमान इंग्लंडने 175 पदकांसह (56 सुवर्ण, 65 रौप्य, 53 कांस्य) दुसरे स्थान मिळवले. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत रंगलेल्या यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या साधारणपणे 200 ऍथलिट्सनी 16 विविध खेळांमधून उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Bengaluru: CWG 2022 triple jump gold medallist Eldhose Paul (C), silver medallist Abdulla Aboobacker (R) and 3000 M steeplechase silver medal winner Avinash Sable during a welcome ceremony at SAI Bangalore, in Bengaluru, Tuesday, Aug. 9, 2022. (PTI Photo/Shailendra Bhojak) (PTI08_09_2022_000172B)

साबळे-पॉलचा धडाका, अचंथा शरथ कमलचा धमाका

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसताना देखील भारताने ऍथलेटिक्स व लॉन बॉल्समधील यशामुळे पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. मागील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या 66 पदकांमधील 25 टक्के पदके फक्त नेमबाजीतूनच मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा नेमबाजीचा समावेश नसल्याने भारतीय पथक 50 पदके तर मिळवू शकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात ट्रक अँड फिल्ड इव्हेंट्समधील 8 पदकांच्या बळावर भारताने 61 पदकांपर्यंत मजल मारली. शिवाय, राष्ट्रकुल इतिहासात लक्षवेधी यश नोंदवले.

एल्डहोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकर यांचे तिहेरी उडीतील वन-टू फिनिश प्रदीर्घकाळ संस्मरणात राहणारे ठरेल. अविनाश साबळेने 3 हजार मीटर्स स्टीपलचेसमध्ये मिळवलेले रौप्य व उंच उडीत तेजस्विन शंकरचे कांस्य विशेष लक्षवेधी ठरले. मुरली श्रीशंकरचे लांब उडीतील रौप्य भारतासाठी 1978 नंतरचे पहिलेच पदक ठरले.

महिला गटात अन्नू राणीने भालाफेकीचे कांस्य जिंकत या इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी पहिलीवहिली भारतीय महिला ऍथलिट होण्याचा मान प्राप्त केला. प्रियांका गोस्वामी व संदीप कुमार यांनी 10 हजार मीटर्स रेसवॉकमध्ये पदके जिंकत नवा इतिहास रचला. वर्ल्ड चॅम्पियनशिप पदकजेती अंजू बॉबी जॉर्जने भारताला किमान 7 पदके मिळतील, असा अंदाज नोंदवला होता. पण, नीरज चोप्राच्या गैरहजेरीतही ऍथलेटिक पथकाने धवल यश प्राप्त केले.

लॉन बॉल्समधील सुवर्ण व रौप्य

व्हिक्टोरिया पार्कमधील लॉन बॉल्स ग्रीन एरेनात भारताने यंदा सुवर्ण व रौप्य जिंकण्याचा पराक्रम गाजवला, ते विशेष लक्षवेधी ठरले. पोलीस कॉन्स्टेबल, क्रीडा शिक्षक व वनाधिकारी अशा त्रिकुटाचा समावेश असलेल्या पथकाने वूमन फोर्स गटात सुवर्ण जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लवली चोबे, पिंकी, रुपा राणी तिर्की व नयनमोनी सायकिया यांचा या संघात समावेश राहिला. या सुवर्णपदकापासून प्रेरणा घेत पुरुष संघानेही रौप्य जिंकत नवा इतिहास रचला. 1930 पासून स्पर्धेचा घटक असलेल्या या अनोख्या इव्हेंटमध्ये भारताचे हे यश अभूतपूर्व ठरले.

कुस्तीतील 12 इव्हेंट्समध्ये यश

राष्ट्रकुलमधील वरचष्मा कायम राखताना भारतीय मल्लांनी यंदा 6 सुवर्णपदकांसह सर्व 12 इव्हेंट्समध्ये उत्तम यश मिळवले. रवि दहिया, बजरंग पुनिया या ऑलिम्पिक पदकजेत्यांसाठी येथे सुवर्ण जिंकणे जणू ‘वॉक इन द पार्क’ ठरले. साक्षी मलिक व विनेश फोगट यांनीही खराब फॉर्मवर मात करत यशस्वी पुनरागमन केले. ज्युडो मॅटमधील 3 पदकेही महत्त्वाची ठरली. यातील दिल्लीस्थित तुलिका मानचे रौप्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरले.

कुस्तीनंतर टेटेमध्ये भारताला सर्वाधिक पदके मिळाली. 40 वर्षीय शरथ कमलने सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम गाजवला आणि राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील आपली पदकसंख्या 13 वर नेली. त्याने एकेरीत 16 वर्षानंतर जेतेपद मिळवले, तो ही महत्त्वाचा क्षण ठरला.

पॅरालिम्पिक पदकजेती भाविना पटेलने सी 3-5 गटात सुवर्ण जिंकले तर बॅडमिंटनमध्येही भारताने 3 सुवर्ण नोंदवली. सुपरस्टार पीव्ही सिंधूने महिला एकेरी, लक्ष्य सेनने पुरुष एकेरी तर सात्विक-चिराग यांनी पुरुष दुहेरीत सुवर्णपदकांची कमाई केली. बॉक्सिंग एरेनात नितूने 48 किलोग्रॅम वजनगटात तर अमित पांघलने 51 किलोग्रॅम गटात यश मिळवले. महिला क्रिकेट संघाने रौप्यपदकावर समाधान मानणे मात्र अपेक्षाभंग करणारे ठरले. हॉकीमध्ये संमिश्र यश मिळाले. महिला संघाने मेलबर्न 2006 नंतर पहिलेच पदक जिंकले तर पुरुष संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

भारताने याशिवाय वेटलिफ्ंिटगमध्ये 10 पदके जिंकली. यात मीराबाई चानू, अचिंता शेऊली व जेरेमी यांच्या 3 सुवर्णपदकांचा समावेश राहिला. भारतीय मुष्टियोद्धय़ांनी एकूण 7 पदके जिंकली. अमित पांघल, नीतू व निखत यांनी सुवर्ण मिळवले. ऍथलेटिक्समध्ये 8, टेटेमध्ये 7, बॅडमिंटनमध्ये 6 तर ज्युडो-स्क्वॅशमध्ये प्रत्येकी 2 पदके मिळाली. पॅरा-पॉवरलिफ्टर सुधीरने पॅरा-पॉवरलिफ्ंिटगमध्ये पहिले सुवर्ण मिळवले.

पदकजेत्या ऍथलिट्सचे भारतात जंगी स्वागत

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत लक्षवेधी यश मिळवून मायभूमीत परतणाऱया भारतीय ऍथलिट्सचे देशातील विविध भागात जंगी स्वागत करण्यात आले. मल्ल बजरंग पुनिया, दीपक पुनिया, मोहित गरेवाल, मुष्टियोद्धे अमित पांघल, रोहित टोकास, जास्मिन लाम्बोरिया, सागर अहलावत यांचे दिल्ली विमानतळावर विविध वाद्यांच्या गजरात स्वागत केले गेले. ऍथलिट्सचे कुटुंबीय, चाहते, विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते.

भारतीय ज्युडोका तुलिका मान हिने आपण आपल्या या स्वागताने भारावून गेले असल्याची प्रतिक्रिया दिली. यंदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असले तरी पुढील वेळी मी निश्चितपणाने सुवर्ण आणेन, अशी ग्वाही तिने येथे दिली.

साक्षी मलिक, पूजा सिहाग, पूजा गेहलोत विमानतळावर बाहेर आल्यानंतर त्यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले. साक्षी व पूजा सिहाग यांनी सर्वांचे आभार मानले. एल्डहोस पॉल, संदीप कुमार, अविनाश साबळे व अब्दुल्ला अबूबाकर यांच्यावरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.

कोट्स

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतील अव्वल यश प्रेरणादायी आहे. सर्व पदकजेते, त्यांच्या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाटा असणारे सर्व घटक व पथकातील सदस्यांचे अभिनंदन. सर्व भारतीयांना आपला अभिमान वाटतो.

-भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा

The Captain of the Indian Cricket Team, Virat Kohli and noted actor Anushka Sharma calls on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on December 20, 2017.

बर्मिंगहम राष्ट्रकुल 2022 स्पर्धेतील सर्व जेत्यांचे व स्पर्धकांचे विशेष अभिनंदन. आम्हा सर्वांना आपला खूप अभिमान आहे. जय हिंद.

-भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली

पूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत असताना आम्ही जणू आमच्यावरच बंधने लादत असायचो. पण, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण जिंकत आम्हा सर्वांची जणू मानसिकताच बदलून टाकली आहे. या पार्श्वभूमीवर, नीरजचे विशेष आभार.

-तिहेरी उडीतील सुवर्णजेता एल्डहोस पॉल

Related Stories

पै.पृथ्वीराज पाटीलची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Shinde

लंका-हॉलंड यांच्यात आज शेवटचा पात्रता सामना

Amit Kulkarni

विंडीजचा सराव सामना : रेमन रिफेरचे 11 चेंडूत 5 बळी

Patil_p

अफगाणिस्तानात IPL च्या प्रसारणावर बंदी

datta jadhav

लंका प्रीमियर लीगमध्ये इरफान पठाण खेळणार

Patil_p

आरसीबीचे प्रशिक्षक माईक हेसन मायदेशी रवाना

Patil_p
error: Content is protected !!