प्रतिनिधी/ वास्को
वास्को कुठ्ठाळी महामार्गावरील एका सांकवावरून इनोव्हा कार ओहोळात कोसळण्याची घटना मंगळवारी सध्याकाळी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना वास्कोतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वास्को कुठ्ठाळी महामार्गावरील माटवे दाबोळी भागातील सांकवावर ही घटना घडली. या ठिकाणी धोकादायक वळण असून या वळणावर वाहन चालकाचा वाहनावरील ताबा जातो व वाहन सांकवावरून नाल्यात कोसळते. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना या वळणावर घडलेल्या आहेत. पर्यटक व अन्य नवख्या चालकांना या वळणाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा घटना घडत असतात. अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी संबंधीत खात्याने या रस्त्यावर गतीरोधक बसवावेत किंवा अन्य सुरक्षा उपाययोजना आखाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. बऱयाच वेळा स्थानिक लोकांनाच अपघातात सापडलेल्यांना वाचवण्यासाठी धाव घ्यावी लागते.
मंगळवारी संध्याकाळीही अशा प्रकारचे स्थानिक युवकांनी साकवावरून नाल्यात कोसळलेल्या चार जणांना इनोव्हा कारमधून बाहेर काढले व त्यांना 108 रूग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्य दाखल केले. अग्नीशामक दलही अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात सापडलेले चार जण गंभीर जखमी झालेले आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.