2026 बीएमडब्ल्यू कंपनी आणणार कार
नवी दिल्ली
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब सर्वच ऑटो कंपन्या करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून बीएमडब्ल्यू कंपनीने पुढचे पाऊल टाकत येत्या काळात सरडय़ाप्रमाणे रंग बदलणारी कार सादर करण्याची योजना आखली आहे. कंपनीने अत्याधुनिक लक्झरी कार आयव्हीजन डी ही नवी कार आणण्याचे नियोजन केले आहे. या कारला कोणत्याही प्रकारचा डॅश बोर्ड किंवा स्क्रिन नसणार आहे. जर्मनीतील लक्झरी कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूने अमेरिकेतील लास वेगास येथे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो-2023 मध्ये 10 जानेवारीला वरील नवी गाडी सादर करून प्रदर्शनाला भेट देणाऱयांना चकित करून सोडले होते. त्या गाडीविषयी तेथेच व जगभरात चर्चा झाली होती. रंग बदलणारी कार पाहून साऱयांच्या नजरा त्या कारवर प्रदर्शनात खिळून राहिल्या होत्या. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्त्झनेगर याच्या उपस्थितीमध्ये कारचे अनावरण करण्यात आले. फिकट हिरवा, गडद मरून आणि पांढरा तसेच लाल असे विविध रंग या कारमध्ये पाहायला मिळतात.
कधी येणार बाजारात?
सदरची गाडी प्रदर्शनात दाखल झाल्यापासून गाडीच्या लाँचिंगविषयी चर्चा सुरु झाली आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार सदरची गाडी 2026 मध्ये प्रत्यक्षात बाजारात उतरवली जाणार आहे. सरडय़ाप्रमाणे रंग बदलणाऱया या कारचे उत्पादन 2025 मध्ये घेतले जाणार आहे. 2026 मध्ये ही कार प्रत्यक्षात ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.