ऑनलाईन टीम / तरुण भारत :
प्रभादेवी आणि दादर परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडय़ानंतर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करुन पाच शिवसैनिकांना अटक केली. दरम्यान, या राडय़ावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दोन वेळा हवेत गोळीबार केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. शिवसेनेचे अनिल परब यांनी कायद्याच्या दृष्टीने पोलिसांना ही बाब पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला, अशी माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
खासदार अरविंद सावंत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात दादर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं. सदा सरवणकर यांनी गोळीबार केला आहे. त्यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवला आहे. अनिल परब यांनी कायद्याच्या दृष्टीने ही बाब पोलिसांना पटवून दिली. त्यानंतर सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : 5 ते 18 वयोगटासाठी लवकरच नाकावाटे कोरोना लस
चोराच्या उलट्या बोंबा’ या म्हणी प्रमाणे तक्रार दाखल करायला आलेल्या आमच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही. राज्यकर्ते असलेल्या लोकांकडून विरोधकांना संपवण्याची भाषा केली जाते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप सावंत यांनी केला.