पोलीस ठाण्यातील सफाई कर्मचारी आत्महत्या प्रकरणःया प्रकरणांत अन्य एका महिलेवरही गुन्हाः दीड लाख कर्जाचे साडे अकरा लाख रूपये झाले
प्रतिनिधी/सांगली
शहर पोलिस ठाण्याच्या टेरेसवर आत्महत्या केलेल्या सफाई कर्मचारी अतुल विकास गर्जे-पाटील (वय 36, रा. बदाम चौक) याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱया खासगी महिला सावकार सुवर्णा पाटील हिच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी रेखा पाटील नामक महिलेवरही गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
अतुल गर्जे-पाटील यांनी मंगळवारी पोलिस ठाण्याच्या टेरेसवर विष पिऊन आत्महत्या केली होती, अतुल याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये सावकार महिला सुवर्णा पाटील हिच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे लिहिले होते. 2017 मध्ये अतुल यांने तिच्याकडून दीड लाखाचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची रक्कम साडेअकरा लाख झाली होती. हे कर्ज फेडण्यासाठी अतुल यांने सुवर्णा पाटील हिला साडेअकरा लाखाचा धनादेशही दिला होता. पण हा धनादेश तिने वटविला नाही. त्यामुळे अतुल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यातूनच तो तणावात गेला होता या तणावातूनच त्यांने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अतुल गर्जे-पाटील हा शहर पोलिस ठाण्यात गेल्या काही वर्षापासून सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मित्तभाषी असलेला अतुल पत्नी, दोन मुली, आई-भाऊ यांच्यासह जुनी पोलिस लाईनजवळील बदाम चौकात राहत होता. मंगळवारी सकाळी साडे अकरापर्यंत पोलिस ठाण्यातील सफाईचे काम आटोपले. त्यानंतर तो कोणाला दिसला नव्हता. दरम्यान महापालिकेचे चार ते पाच कर्मचारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात आले. पोलिस ठाण्यावरून गेलेल्या केबलची दुरूस्ती करायची असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे अंमलदारांनी खात्री करून त्यांना टेरेसवर पाठवले. कर्मचारी टेरेसवर गेले तेव्हा एका कोपऱयात अतुल तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत निपचिप पडलेला दिसला. त्यामुळे कर्मचारी घाबरून खाली आले. त्यांनी ठाणे अंमलदारांना हा प्रकार सांगितला. त्यांनी कर्मचाऱयांसह वरती जाऊन पाहणी केली. तेव्हा अतुलच्या बाजूला विषाची बाटली पडलेली दिसली. तत्काळ त्याला उचलून सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले होते.