Tarun Bharat

2 कोटी 12 लाखांची अर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

पुलाची शिरोली / वार्ताहर

दोन कोटी बारा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टोप येथील पंचधारा महिला खाण मजूर व औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा व सचिवांविरुध्द शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुजा हणमंत चौगले व हणमंत तातोबा चौगले दोघेही रा. गंधर्व रिसॉर्ट जवळ, टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर अशी संशयितांची नावे आहेत. सौ. अदिती अरविंद पाटील वय २९, रा. मेघराज कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,सौ. अदिती पाटील यांचे पती अरविंद पाटील हे क्रशर व्यावसायिक आहेत. पत्नी अदिती यांच्या नावाने ते अदिती स्टोन क्रशर चालवतात. क्रशर करण्यासाठी त्यांना खाण मालकांकडून दगड विकत घ्यावा लागतो. त्यामुळे टोप येथील पंचधारा महिला खाण मजूर व औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा पुजा चौगले व सचिव हणमंत चौगले हे दोघे अरविंद पाटील यांच्या संंपर्कात आले. आपल्या संस्थेच्या नावे दगड उत्खनन करण्याची कायदेशीर मान्यता आहे असे चौगले यांनी अरविंद पाटील यांना सांगितले. तसेच याबाबतचे कागदही दाखवले. त्यामुळे अरविंद पाटील यांनी त्यांच्यांशी दगड उत्खनन करण्याचा दहा वर्षाचा करार केला. दरम्यान रॉयल्टी भरण्यासाठी चौगले दांपत्याने अरविंद पाटील यांच्याकडून दोन कोटी बारा लाख रुपये घेतले. दहा वर्षाचा उत्खनन करण्याचा करार असल्याने ही रक्कम त्या तुलनेत कमी होती. मात्र करारानंतर अवघ्या तीन महिन्यात पंचधारा महिला खाण मजूर व औद्योगिक सहकारी संस्था अशा प्रकारे दुसर्‍याला उत्खनन करण्यासाठी जागा देऊ शकत नाही असा मुद्दा पुढे करत चौगले दांपत्याने अरविंद पाटील यांना उत्खनन क्षेत्रात येण्यास प्रतिबंध केला. तसेच रक्कम देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे सौ. पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Stories

एकाच वर्ग खोलीत अनेक इयत्तांचे ‘धडे’!

Archana Banage

संभाजीराजेंच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठबळ

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कोथळीतील वीरजवान सतीश वायदंडे अनंतात विलीन

Archana Banage

कोल्हापूर : क्लिनिकमधील डॉक्टर ठरताहेत तारणहार!

Archana Banage

आजारास कंटाळून पती, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

Archana Banage

Kolhapur: सीएचबीधारकांची दिवाळी झाली गोड

Archana Banage