शाहुवाडी प्रतिनिधी
कडवे (ता. शाहूवाडी) येथे अल्पवयीन चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित नराधम तरुणाला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडवे (ता. शाहूवाडी) येथे फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीला (वय १५) राहत्या घरी एकटीला गाठून संशयित सद्या १० वीत शिकत असलेल्या तरुणाने मे २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगू नको, नाही तर तुझी बदनामी करीन, अशी आरोपी हा पीडितेला धमकीही देत होता.
दरम्यान, या लैंगिक अत्याचारामध्ये संबंधित पीडित मुलीला दिवस गेले. पीडितेला शारीरिक त्रास होऊ लागल्यामुळे शासकीय दवाखान्यात दाखल केल्यानंतर या गुन्ह्याला अखेर वाचा फुटली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमएलसीद्वारे शाहूवाडी पोलिस ठाण्यात वर्दी दिली. तर पीडितेच्या आईने गुरुवारी (ता.२९) रात्री पोलीस ठाण्यात येऊन संशयित तरुणाविरुद्ध फिर्याद दिली.
शुक्रवारी दुपारी संशयित आरोपीला कोल्हापूर येथील जिल्हा विशेष (पोस्को) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी किशोरवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील या सदर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.