निमंत्रणपत्रिका झाली व्हायरल
तुम्ही अनेक प्रकारच्या सोहळय़ांमध्ये भाग घेतला असाल, विवाह, वाढदिवस, साखरपुडा यांचा यात समावेश असेल. परंतु तुम्ही कधी ‘घटस्फोट सोहळय़ा’त सहभागी झाला आहात का? याचे उत्तर बहुधा नाही असेल. परंतु मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पहिल्यांदाच ‘विवाह विच्छेद सोहळा’ म्हणजेच ‘घटस्फोट समारंभा’चे आयोजन केले जात आहे.
हे आयोजन भाई वेलफेअर सोसायटीकडून करण्यात येत आहे. याकरता सोसायटीने रितसर निमंत्रणपत्रिकांचे वाटप केले असून ती विवाहपत्रिकेच्या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आता ही निमंत्रणपत्रिका व्हायरल होत आहे. 18 सप्टेंबर रोजी होणारा हा ‘विवाह विच्छेद समारंभ’ चर्चेचा विषय ठरला आहे. या समारंभात वैवाहिक संबंधांतून मुक्ती मिळाल्याचा आनंद व्यक्त केला जाणार आहे.
या समारंभात येणाऱया लोकांना निमंत्रित केले जात आहे. विवाहादरम्यान ज्याप्रकारच्या विधी असतात, त्याचप्रकारे त्याच्या उलट विधी ‘विवाह विच्छेद समारंभा’त असणार आहेत. यात संगीत, जयमाला विसर्जन, वरात वापसी इत्यादींचा समावेश असणार आहे. याचबरोबर समारंभाशी निगडित माहिती प्राप्त करण्यासाठी पुरुष हेल्पलाइन क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या विवाह विच्छेद निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाशी संबंधित सर्व तपशील देण्यात आला आहे. ज्या पुरुषांनी घटस्फोटाच्या प्रक्रियेत त्रास सहन केला आहे, त्यांना उत्साहाने पुन्हा नवे जीवन सुरू करता यावे यासाठी हे आयोजन करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर याप्रकरणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त हाते आहेत. एका ट्विटर युजरने ‘घटस्फोट समारंभा’ची निमंत्रणपत्रिका शेअर केली आहे. तर एका युजरने ‘विवाहाचे निमंत्रण जुने झाले आता घटस्फोटाची निमंत्रणपत्रिका पहा’ असे नमूद केले आहे.