15 दिवसांसाठी खुले झाले नरकाचे द्वार
भूत-प्रेतांवर काही जणांचा विश्वास असतो तर काही जण हा प्रकार मानत नाहीत. परंतु एका देशात 15 दिवस भूतांना अन्न भरविले जाते. जर असे केले नाही तर वाईट आत्मा आणि भूत आपल्या कुटुंबाला त्रास देतील असे लोकांचे मानणे आहे.
कंबोडियामध्ये शरद ऋतूत एक उत्सव साजरा केला जातो, ज्याला पचम बेन फेस्टिव्हल म्हटले जाते. हा फेस्टिव्हल दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरदरम्यान खमेर चंद्र कॅलेंडच्या 10 व्या महिन्यादरम्यान 15 दिवसांसाठी असतो. या उत्सवादरम्यान 15 दिवसांपर्यंत नरकाचे द्वार खुले होते आणि वाईट आत्मा आणि भूत बाहेर पडत असल्याचे मानले जाते. या भूतप्रेतांकरता या कालावधीत अन्न शिजविण्यात येते. या उत्सवात चार प्रकारचे आत्मा किंवा भूतं असतात. ही भूत अस्थायी स्वरुपात मुक्त असतात आणि ती केवळ रक्त आणि मांसाचे ग्रहण करतात असे मानले जाते. भूतांसाठी अन्न शिजविल्यास ती आशीर्वाद देऊन पुन्हा नरकात परतत असल्याचे या लोकांचे मानणे आहे.
या उत्सवादरम्यान भूतं मंदिर, स्मशानभूमी आणि स्वतःच्या नातेवाईकांच्या घराच्या आसपास चांगल्या भोजनाच्या शोधात हिंडत असतात आणि त्यांना चांगले भोजन न मिळाल्यास ती त्रास देऊ लागतात असे या लोकांचे मानणे आहे.
सूर्योदयापूर्वीच स्वयंपाक
प्राचीन प्रथेनुसार कंबोडियात या प्रथेचे अधिक पालन केले जाते. यात कुटुंब स्वतःच्या मागील 7 पूर्वजांसाठी भोजन तयार करते. हा उत्सव सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी कुटुंबीय सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वीच स्वयंपाक करतात, भूतांना प्रकाश आवडत नसल्याने ते किंचित उन्ह दिसून आले तरीही भोजन स्वीकार करणार नाहीत असे या लोकांचे मानणे असते. कंबोडियात हा उत्सव अंगकोरियन काळापासून साजरा करण्यात येत आहे.