हैदराबादमधील धक्कादायक घटना ः सीसीटीव्हीत कैद
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादच्या अंबेरपेट भागात काळीज हादरवून टाकणारी घटना घडली आहे. तेथे भटक्या श्वानांनी रस्त्यावून जात असलेल्या 4 वर्षीय मुलाचे लचके तोडले आहेत. 6 श्वानांच्या या हल्ल्यात या मुलाचा मृत्यू झला आहे. त्यानंतर श्वानांनी या मुलाच्या मृतदेहाला तेथेच उभ्या असलेल्या एका कारखाली नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.
मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव प्रदीप असून तो एरुकुला वस्तीत राहणाऱया गंगाधर यांचा मुलगा होता. 4 वर्षांपूर्वी गंगाधर हे पत्नी आणि दोन मुलांसह हैदराबादमध्ये कामानिमित्त राहण्यासाठी आले होते. अंबेरपेट येथील एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रविवारी गंगाधर यांनी मुलगा प्रदीपला स्वतःच्या सोबत नेले होते. मुलाला केबिनमध्ये सोडून ते काही कामासाठी बाहेर गेले होते. काही वेळाने प्रदीप केबिनबाहेर पडून पार्किंगमध्ये पोहोचला. तेव्हा त्याच्यावर 3 श्वानांनी हल्ला केला.
प्रदीप खाली पडल्यावर आणखी 3 श्वान तेथे पोहोचले. या सर्व श्वानांनी मग प्रदीपचा चावा घेण्यास सुरुवात केली. श्वानांच्या हल्ल्यांमुळे घाबरलेला प्रदीप रडू लागला, परंतु तेथे कुणीच नसल्याने मदत मिळू शकली नाही. श्वानांच्या हल्ल्यात तो बेशुद्ध झाल्यावर त्याला कारखाली खेचत नेण्यात आले. प्रदीपच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. श्वानांच्या हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही चित्रणामुळे समोर आला.
तर हैदराबाद महापालिकेच्या अधिकाऱयांनी याच भागात 2 दिवसांपूर्वी 28 भटक्या श्वानांना पकडल्याचा दावा केला आहे. या श्वानांची नसबंदी करत त्यांना सोडून देण्यात आली होती.