दहशतीमुळे लोकांची उडाली झोप
जर तुम्ही घरात बसलेले असाल आणि अचानक तुमच्या पायाखालची जमीन खचू लागल्यास आणि तुमचे पूर्ण घर एका खड्डय़ात सामावले गेल्यास तुमच्यावर कुठलीच स्थिती ओढवले? हा विचार मनात आला तरीही संबंधिताचा थरकाप उडून जातो. परंतु एका शहरात सध्या काहीशी अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण शहर खड्डय़ांमध्ये सामावले जात आहे. दहशत अधिक असल्याने लोकांना स्वतःच्या घरात झोपता देखील येत नसल्याची स्थिती आहे.
दक्षिण पोलंडच्या स्त्रsबिनिया शहराबाबत हे घडत आहे. मागील दोन वर्षांमध्ये शहरात कमीतकमी 20 विशाल आकाराचे खड्डे तयार झाले असून यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अनेक खड्डे तर 15-15 मीटर रुंदीचे आहेत. म्हणजेच एका खड्डय़ात अनेक घरे सामावून जातील. तसेच या खड्डय़ांची खोली 10 मीटरपेक्षा अधिक आहे. हे खड्डे भूकंपाप्रमाणे आपत्ती ठरत आहेत. या खड्डय़ांमुळे भूगर्भ तज्ञ देखील चकित झाले आहेत. नवा खड्डा कुठे तयार होईल हे कुणीच जाणत नाही. आम्ही लोक जणू एखाद्या टाइम बॉम्बवरच बसलो आहोत. आमच्या पायाखालील जमीन कधी खचेल हेच आम्हाला माहिती नाही असे उद्गार रेसिडेंट असोसिएशनचे प्रमुख मातेउस क्रोल यांनी काढले आहेत.
उद्याने बंद
या भागात कधीकाळी कोळशाची खाण होती, ही खाण सुमारे 20 वर्षांपूर्वी बंद करण्यात आली, मग 10 वर्षे सर्वकाही सुरळीत चालले, परंतु मागील काही काळापासून येथील जमीन खचू लागली आहे. अनेक ठिकाणी दहशतीमुळे उद्याने बंद करण्यात आली आहेत. तेथे जमीन खचल्यास मोठय़ा प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका दफनभूमीची जमीन खचल्याने 40 हून अधिक थडगी जमिनीत सामावली गेली आहेत. तर काही घरे देखील खड्डय़ांमध्ये सामावली आहेत.
खाणीतील भुयार कधीच भरून काढण्यात आले नव्हते. तेव्हा लाकडांद्वारे या भुयारांना आधार देण्यात आला होता, परंतु काही काळानंतर हे लाकूड सडू लागल्याने ही भुयारं कोसळून तेथील जमीन खचत आहे. याची कल्पना असूनही येथे एक विशाल शहर वसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त आहे. या भुयारांची खोली इतकी अधिक आहे की त्यात कोसळल्यास वाचण्याची शक्यता नाही. सरकारने काही भागांना रेड लाइट झोनघोषित केले आहे. तसेच तेथे ये-जा करण्यावर बंदी घातली आहे. पूर्ण शहरच खड्डय़ांवरच तयार करण्यात आले असेल तर समस्या ही होणारच.