प्रतिनिधी / गोकाक : गोकाक शहराच्या मध्यवस्तीमध्ये असणारे क्लासवन कॉन्ट्रॅक्टरचे घर फोडून चोरट्यांनी घरातील सुमारे १३१ तोळे सोने, साडेदहा किलो चांदी व ३० लाख ६० हजार रुपये रोख अशा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. प्रकाश तोळीनवर यांच्या घरात ही चोरी झाली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रकाश यांच्या मुलीची सासू आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी प्रकाश हे शुक्रवारी सकाळी ११ वा. कुटुंबासह बदामीला गेले होते. त्यामुळे घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डाव साधला. प्रकाश हे रात्री ११ च्या सुमारास परत आले असता त्यांना घराचे गेट उघडे असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता घराच्या खिडकीच्या सळ्या चोरट्यांनी वाकवून घरात प्रवेश करीत चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानी याची माहिती पोलिसांना कळविली असता पोलिसांनी घरी भेट देत पाहणी केली तसेच श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले. दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.