Tarun Bharat

‘एलएसी’वरील परिस्थितीवर भारताकडून चोख निरीक्षण

लष्करप्रमुखांचे प्रतिपादन : सीमेवर मोठ्या संख्येने चिनी सैन्य तैनात असल्याचाही दावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या काही वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमावाद सुरू आहे. चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच ‘एलएसी’वर अतिशय वेगाने पायाभूत सुविधा निर्माण करत असतानाच त्यांनी तेथे मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. सध्या एलएसीवरील परिस्थिती स्थिर असली तरीही तेथे निरीक्षण आणि लक्ष ठेवून राहणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले आहे.

एप्रिल-मे 2020 मध्ये चीनने पूर्व लडाखमधून अनेकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून, पीपल्स लिबरेशन आर्मीने तेथे सुमारे 50,000 सैनिक आणि अवजड शस्त्रे तैनात केली आहेत. तथापि, पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत विस्तारलेल्या 3,488-किमी-लांब ‘एलएसी’च्या तीनही सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची मजबूत तैनाती आणि पाळत ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. आमची क्षमता विकास आणि नवीन तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र प्रणालींसह प्रयत्न सुरू आहेत. आम्ही पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेषत: रस्ते, हेलिपॅड यांसारख्या क्षेत्रात भर देत आहोत, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.

तोडगा काढण्यासाठी चीनशी सतत चर्चा

पूर्व लडाखमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चीनशी सतत चर्चा करत आहोत. जोपर्यंत आम्हाला अपेक्षित असलेला न्याय्य तोडगा निघत नाही तोपर्यंत सैन्याची तैनाती आणि सतर्कता उच्च पातळीवर राहील. चीनशी राजनैतिक आणि लष्करी चर्चेने पूर्व लडाखमधील डेपसांग मैदाने आणि डेमचोकमधील उर्वरित संघर्षबिंदू मिळविण्यासाठी सतत प्रयत्न सुरू ठेवले जातील, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.

पाकिस्तानमधून ड्रोनच्या कुरापतींमध्ये वाढ

पाकिस्तानी घुसखोरीबद्दल बोलताना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यासाठी ड्रोनचा वापर करून शस्त्रे आणि अमली पदार्थ टाकण्याच्या घटना अलीकडच्या काळात खूप वाढल्याचे जनरल पांडे यांनी नमूद केले. 778 किमी लांबीच्या नियंत्रण रेषेवर घुसखोरी रोखण्यासाठी लष्कर सज्ज आहे. पण पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये कोणतीही मोठी घट झालेली नसल्याचेही ते पुढे म्हणाले.

Related Stories

जम्मू : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय जवान कृष्ण वैद्य यांना वीरमरण

Tousif Mujawar

राज्यात नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू

Patil_p

देशातील सर्व भागात पोहचणार कोरोना टेस्टिंग किट, भारतीय पोस्ट व आयसीएमआर यांच्यात करार

Tousif Mujawar

पहिल्यांदाच परराज्यातील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व

datta jadhav

सीबीआय तपासासाठी राज्यांची अनुमती बंधनकारक

Patil_p

बडगाम चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav