जत्रोत्सवासाठी शिरगावसह राज्यभरातील धोंडगण सज्ज : चौगुले धोंडगणांसह सर्व धोंडगणांचे व्रत अंतिम टप्प्यात
प्रतिनिधी / डिचोली
बहिणभावांच्या वादातून आपल्याला उच्चारलेल्या अपशब्दामुळे रागावलेली लहान बहिण देवी श्री लईराईने आपल्या भावंडांसमोर केलेला अग्निदिव्य मार्गक्रमण करण्याचा पण देवी श्री लईराई आज पूर्ण करणार आहे. गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे मोठय़ा प्रमाणात होऊ न शकलेला हा भव्य जत्रोत्सव यावषी मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र मोठा उत्साह आणि चैतन्य पसरले आहे. देवीच्या व्रतस्थ चौगुले व इतर सर्व धोंडगणांचे सोवळे व्रत अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आज देवी लईराईचे दर्शन घेऊन अग्निदिव्य मार्गक्रमण करण्यास सर्व धोंडगण सज्ज झालेले आहेत.
देवीचे अग्निदिव्य मार्गक्रमण म्हणजे भाविक भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते. गेली दोन वर्षे या क्षणाला मुकलेल्या लोकांकडून आज गुरू. दि. 5 मे रोजी जत्रोत्सवानिमित्त मोठी गर्दी होणार आहे. शिरगावात मोठय़ा संख्येने फेरीवाल्यांनी आपापली दुकाने थाटली आहेत. या जत्रोत्सवाचे खास आकर्षण असलेले देवीचे भव्य होमकुंड रचण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. काल बुध. दि. 4 रोजी रात्रीपर्यंत होमकुंड रचण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. मंदिर परिसरात आदल्याच दिवशी फुलवल्यांची गर्दी झाली आहे. हातात देवीला प्रिय असलेले मोगरीच्या कळय़ांची माळा घेऊन महिला पुरूष फुलविपेते उभे आहेत.
गेला महिनभर शाकाहार पाळून जत्रोत्सवापूर्वी पाच व तीन दिवस पवित्र ठिकाणी सोवळे व्रत पाळणाऱया धोंडगणांचे व्रत अंतिम टप्प्यात आले आहे. काल सर्व धोंडगणांच्या ठिकाणी लोकांसाठी व्हडले जेवण झाले. आज जत्रोत्सवादिनी सर्व धोंडगण उपवास पाळणार, केवळ फराळ ग्रहण करून प्रत्येक धोंडगण शिरगावात देवीच्या चरणांकडे जायला निघणार आहेन. देवीच्या सर्व प्रमुख कामांमध्ये वावरणाऱया चौगुले धोंडगणांचे सोवळे व्रतही अंतिम टप्प्यात आहे. एकंदरीत सर्वच पातळीवरून जत्रोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे.
जत्रोत्सवाचे स्वरूप
आज गुरू. दि. 5 मे रोजी सकाळी शिरगावातील देवी लईराईच्या मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. देवीच्या कळसातील तीर्थ संपूर्ण गावातील घरांमध्ये वितरीत करण्यात येणार व संपूर्ण गाव सुचिर्भूत केला जणार आहे. दु. 12 वाजण्याच्या सुमारास मयेतील चौगुले देवीचा कवळास घेऊन शिरगावात दाखल झाल्यानंतर देवीची उत्सवमूर्ती (देवीची चिरा) देवीच्या मूळ आदिस्थानात म्हणजे मुड्डी येथे मंदिरात वाजत गाजत नेली जणार आहे. समवेत असंख्य धोंडगण उपस्थित असणार आहेत.
रात्री आठ वा. च्या सुमारास दुपारी मुड्डी येथे नेण्यात आलेली देवीची चिरा परत मुख्य मंदिरात नाचत गाजत आणण्यात येणार आहे. रात्री 12 वा. देवीचा कळस मुख्य मंदिरातून बाहेर काढण्यात येणार आहे. वाजत गाजत होमकुंडस्थळी आल्यानंतर देवी चंद्रज्योतीच्या सहाय्याने होमकुंडाला अग्नी देणार व देवीचा कळस थेट पवित्र तळीवर स्नानासाठी जाणार असून त्याचबरोबर असंख्य धोंडगणही तळीवर स्नानासाठी जाणार आहेत. देवीच्या कळसात सर्वप्रथम तीन ओंजळी पाणी भरलेला कळस जाणार व कळस मुड्डी येथे मंदिरात ठेवला जाणार आहे. धोंडगणांनी तळीवर स्नान केल्यानंतर मुड्डी येथे देवीचा प्रसाद (मोगरीचा कळा) तोंडात घेऊन अग्निदिव्य मार्गक्रमणास प्रारंभ होणार आहे. पहाटे देवीच्या कळसाने अग्निदिव्य पार केल्यानंतर जत्रोत्सवाची सांगता होणार व पुढील चार दिवस कौलोत्सव चालणार आहे.
संपूर्ण गाव नटून थटून सज्ज
या जत्रोत्सवासाठी शिरगाव गावाप्रमाणेच बाजूला असलेले अस्नोडा गावही सज्ज झलेले आहे. सर्वत्र रंगरंगोटी व दैदिप्यमान विद्यूत रोषणाई करण्यात आलेली आहे. मंदिरावर खास आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. संपूर्ण जत्रा परिसरात मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. असह्य उकाडय़ामुळे हैराण होणाऱया भाविकांना थंड करण्यासाठी थंडपेयांची, आईस्क्रीम दुकाने मोठय़ा प्रमाणात आहेत. तसेच कलिंगडे, शहाळे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. देवी लईराई व असंख्य धोंडगणांना स्नान देणारी पवित्र तळीही सज्ज झालेली आहे. सर्वत्र चैतन्यमय वातावरण आहे.
होमकुंड रचण्याचे काम पूर्णत्वाकडे
गावातील होमखंडी कुटुंबाकडून वर्षपध्दतीप्रमाणे रचण्यात येणारे या जत्रोत्सवाचे खास आकर्षण देवीचे भव्य असे होमकुंड रचण्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आलेले आहे. रात्री उशिरापर्यंत होमखंडी कुटुंबातील सदस्य व गावातील ग्रामस्थही होमकुंड रचण्याच्या कार्यात गुंतले होते. तसेच होमकुंड स्थळी देवस्थान समितीकडून मज्जाव करण्यात आला असतानाही मोठय़ा प्रमाणात लाकडांचे भोरे दाखल झाले होते.
चौगुले धोंडगण व इतर धोंडगणही सज्ज
देवीच्या प्रमुख कार्यात सहभागी होणाऱया देवीच्या चौगुले धोंडगणांचे व्रत अंतिम टप्प्यात आलेले असून हे धोंडगण आजच्या जत्रोत्सवासाठी सज्ज झालेले आहेत. तसेच मोठय़ा प्रमाणात जत्रेत सहभागी होणारे देविचे भाविक धोंडगणांचे काल रात्री इतर भाविकांसाठी व्हडले जेवण झाल्यानंतर आज जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी अग्निदिव्य पार करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जत्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरगावात खास पोलीस आऊट पोस्ट उभारण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या जत्रोत्सवातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले जाणार आहे. काल बुधवारी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी देवस्थान समिती, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस व इतर संबंधित अधिकाऱयांसह जत्रोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.