घरीच तयार केले सर्व खाद्यपदार्थ
आमच्या देशात कुठल्याही घरात सर्वाधिक मान जावयाला मिळत असतो. जावयाच्या पाहुणचारात कुठलीच कमतरता राहू नये हे कटाक्षाने पाहिले जात असते. विशेषकरून सणासुदीच्या काळात जावयासाठी पंचपक्वाने करत त्यांना आग्रहाने वाढले जाते.
जावयांचे तसेही सर्वत्र स्वागत होत असते. परंतु आंध्रप्रदेशात जावयांचा पाहुणचार हा विशेषच असतो. येथील एका सासूबाईने स्वतःच्या जावयाच्या स्वागतार्थ इतके खाद्यपदार्थ तयार केले की ते मोजताना थकूनच जाल. हे सर्व खाद्यपदार्थ घरीच तयार करण्यात आले होते. एका कुटुंबाने स्वतःच्या घरात एकूण 370 खाद्यपदार्थ तयार करत जावयाला जंगी मेजवानी दिली आहे.
आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्हय़ातील नरसापुरमचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. येथील एका मुलीचे आणि जावयाच्या स्वागताकरता परिवाराकडून एकूण 379 खाद्यपदार्थ वाढण्यात आले आहेत. 10 दिवसांच्या मेहनतीनंतर सासरकडच्यांनी जावयासाठी जेवण वाढण्यास सुरुवात केल्यावर तो दंगच झाला. त्याच्यासाठीच्या या मेजवानीत 40 फ्लेवर्ड राइस, 40 प्रकारच्या करी, 20 प्रकारच्या भाकऱया-चटणी, 100 मिठाई आणि 70 प्रकारचे पेयपदार्थ सामील होते.
अशाचप्रकारची घटना पश्चिम गोदावरीच्या भीमावरममध्ये झाली असून तेथील व्यावसायिक टाटावर्ती बद्री यांनी स्वतःचे जावई आणि मुलीच्या स्वागताकरता 170 खाद्यपदार्थांनी भरलेले ताट वाढले असून याची छायाचित्रे देखील व्हायरल होत आहेत. मुलीची आई याकरता 4 दिवसांपासून काम करत होती. तसेच प्रत्येक खाद्यपदार्थावर त्याचे नाव असलेला फ्लॅग ठेवण्यात आला होता. गोदावरी जिल्हय़ात जावयांच्या स्वागताकरता अशाप्रकारची मेजवानी देण्याची परंपराच आहे.