मडगाव पालिका मुख्याधिकाऱयांचा इशारा : उघडय़ावर कचरा फेकल्यास होणार अशीच कारवाई
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने घरोघरी कचरा संकलन मोहीम राबविण्यास सुरुवात केल्यानंतर सुमारे एक दशकाने ओला व सुका असा विलगीकरण केलेला कचरा न सोपवणाऱया रहिवाशांना आता गोवा ‘नॉन-बायोडिग्रेडेबल’ कचरा नियंत्रण कायदा, 1998 च्या अंतर्गत 5 हजार रुपयांचा दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. सुमारे 65 ठिकाणी उघडय़ावर कचरा फेकला जात असल्याने अशा ब्लॅक स्पॉट्सवर कचरा फेकणाऱया नागरिकांनाही अशाच प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे मुख्याधिकारी रोहित कदम यांनी काढलेल्या सार्वजनिक नोटिसीत स्पष्ट केले आहे.
मडगाव पालिकेने घरोघरी विलगीकरण न केलेला कचरा पालिकेच्या कामगारांकडे सोपविण्यात येत असल्याने यासंदर्भात गांभीर्याने विचार केला आहे आणि आता घरातील कचऱयाचे विलगीकरण न करणाऱया व्यक्तींना दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याधिकारी कदम यांनी शनिवारी नोटीस जारी करून वर्गीकरण न केलेला कचरा सुपूर्द करणाऱयांना आणि कचरा उघडपणे ब्लॅक स्पॉट्सवर फेकणाऱयांना तत्काळ 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
मडगाव पालिक?ा सर्व 25 प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलनाची सेवा देत आहे याकडे लक्ष वेधून मुख्याधिकाऱयांनी म्हटले आहे की, कचरा संकलन पर्यवेक्षकांनी काही व्यक्ती त्यांच्या घरांतील कचऱयाचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्यास नाखूष असतात आणि परिणामी ते मिश्रित कचरा गोळा करणाऱयांकडे सोपवतात, असे आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. इतर प्रकरणांमध्ये हे देखील आपल्या निदर्शनास आले आहे की, मिश्रित कचरा वेगवेगळय़ा आणि अनधिकृत ठिकाणी टाकला जात आहे. यामुळे ब्लॅक स्पॉट्स तयार होतात, असे कदम यांनी म्हटले आहे.
पालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलनाचा उपक्रम सुरू केल्यानंतर सुमारे दशकभराने घरमालकांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. घरमालकांचे सहकार्य मिळण्यासाठी पालिकेने जी-सुडाद्वारे हजारो कचरापेटय़ा प्रदान केल्या होत्या. जेणेकरून घराघरामध्ये कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र बहुतेक ठिकाणी वर्गीकरण होत नसल्याचा पालिकेचा दावा आहे.