भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशच्या नर्मदापुरम जिल्हय़ातील चौकीपुरा गावातील एका चर्चला काही समाजकंटकानी आग लावल्याचे वृत्त आहे. ही आग हिंदू संघटनांच्या सदस्यांनी लावली असा आरोप चर्चच्या व्यवथापनाने केला. मात्र, त्याचा स्थानिक हिंदू संघटनांकडून इन्कार करण्यात आला. रविवारी मध्यरात्री काही लोक चर्चमध्ये घुसले आणि त्यांनी चर्चची नासधूस करुन आग लावली, अशी तक्रार आहे.
मात्र, या लोकांची ओळख पटलेली नाही. त्यांनी चर्चच्या भिंतींवर ‘राम’ हा शब्द लिहिला आहे, असा आरोप काही ख्रिश्चनांनी केला. तथापि, तसा पुरावा आढळलेला नाही, असे अन्य काही नागरिकांचे म्हणणे आहे. या खेडय़ात आदिवासी लोकसमुदायाची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. मध्यरात्री लावण्यात आलेल्या आगीचा हा प्रकार सकाळी लोकांच्या लक्षात आला. त्यानंतर स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. हे चर्च अमेरिकेच्या इव्हँगेलिस्ट ल्यूथरेनियन चर्चशी जोडले गेले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
हे चर्च आदिवासी जनतेचे बेकायदेशीररित्या आणि आमिषे दाखवून धर्मांतर करीत आहे, असा आरोप स्थानिक नागरिक आणि काही संघटनांकडून करण्यात येत आहे. चर्चमध्ये लोकांना प्रार्थनेच्या निमित्ताने बोलावून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त पेले जाते. यासाठी यांना आमिषे दाखविली जातात, असा आरोप होत आहे.