दहा तोळे सोन्यावर डल्ला, तीन फ्लॅट फोडले
वार्ताहर / कोयनावसाहत, कराड
कोयनावसाहत येथील दोन अपार्टमेंटमधील तीन बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरटय़ांनी सुमारे पाच लाखाचा ऐवज लंपास केला. घरात कोणीही नाही हे बघून कपाटातील 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह इतर साहित्यावर चोरटय़ानी डल्ला मारला आहे. कोयनावसाहत (ता. कराड) येथील रायगड या अपार्टमेंटमध्ये मंगाळवारी मध्यरात्रीनंतर ही चोरीची घटना घडली. ती घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अमित महापूरे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कोयनावसाहत परिसरातील बचपन स्कूलजवळ पाचमंदिर परिसरात राजगड अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये अमित महापूरे हे काही वर्षांपासून कुटूंबासह राहतात. मंगळवारी ते कुटुंबासमवेत कोल्हापूरला गेले होते. हीच संधी साधून चोरटय़ाने बंद फ्लॅटचा कोयडा तोडून चोरटय़ाने आत प्रवेश केला. तिजोरीत असणाऱया सुमारे नऊ ते दहा तोळे सोन्यावर डल्ला मारला. फ्लॅटमधील इतर साहित्यही चोरटय़ांनी विस्कटले आहे. त्यानंतर शेजारी असणाऱया बिल्डिंगमध्येही चोरटय़ाने दोन फ्लॅट फोडले मात्र त्याठिकाणी कुणीच राहत नसल्याने चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. पवार, हवालदार संजय जाधव यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.