मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : आर्ल केरी-फेंडा येथे दहाव्या जागोर महोत्सवाचे थाटात प्रारंभ
प्रतिनिधी /फोंडा
गोमंतकीयाची पारंपारिक संस्कृती सातासमुद्रापार पोचविण्य़ाचे शेय ‘जागोर’ या लोककलेला लाभलेले आहे. आजच्या ई-युगात वावरताना गोमंतकीय लोककलेचा वारसा पुढील पिढीला जतन करून ठेवण्यासाठी कला व संस्कृती संचलानायामार्फत लोककला (लोकवेद) अकादमीची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी आर्ल केरी फोंडा येथील जागोर महोत्सवात केली.
गोवा जागोर असोसिएशन, श्रीराम वाडेकरी मंडळ करमळे केरी व कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कला व संस्कृती मंत्री तथा महोत्सवाचे कार्याध्यक्ष गोविंद गावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, कला व संस्कृती संचलनालयाचे संचालक सगुण वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, स्थानिक पंचसदस्य सचिन केरकर, कांचन मदन केरकर, वामन गावडे, गोवा जागोर असोसिएशनचे अध्यक्ष हेमू गावडे, श्रीराम वाडेकर मंडळाचे अध्यक्ष उदय गावडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे बोलताना म्हणाले राज्यभरातील विविध भागातील घोडेमोडणी, रणमाले, विरभद्र, धालो, गडेउत्सव सारख्या लोकपरंपरा तसेच त्या भागातील लोककलेचा प्रसार करण्याहेतू कला व संस्कृतीमार्फत विविध विद्यालयात नेमलेल्या कला आणि संगीत शिक्षकाना जबाबदारी देण्यात येईल. जेणेकरून शालेय स्तरापासून लोककलेच्या जागृतीसाठी प्रयत्न होईल असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
पाश्चात्य संगीताऐवजी लोककलेचा अभिमान बाळगा- डॉ. शेटय़े
माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेटय़े म्हणाले पाश्चात संस्कृतीचा उदोउदो करण्याऐवजी आपल्या पुर्वजांनी राखून ठेवलेली जागोर व इतर लोककलेचा अभिमान बाळगा, लोकनृत्याच्या संगीतावर थिरकून तीचे जतन करावे असे आवाहन केले. स्वागतपर भाषणात मंत्री गोविंद गावडे यांनी गोव्यातील भूमीपूत्र व कष्टकरी समाजाची ओळख असलेली जागोर कलेच्या संवर्धनासाठी आपली तळमळ व्यक्त केली. कला व संस्कृतीच्या माध्यमातून लोककलेच्या संवर्धनासठी प्रयत्न करण्याचे आश्वासक विचार मांडले. श्रीराम वाडेकरी मंडळ करमळे केरी फोंडातर्फे जागोर सादरीकरणाने जागोर महोत्सवाला प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ममता कुर्टीकर व प्रदीप नाईक यांनी केले. हेमु गावडे यांनी आभार मानले.
आज शनिवार 24 रोजी सायं. 6.30 वा. महोत्सवाचा समारोप सोहळा होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषीमंत्री रवी नाईक व पर्यटन मंत्री रोहन खंवटे हे उपस्थित असतील. खास निमंत्रित म्हणून मांद्रेचे आमदार जीत आरोलकर उपस्थित असतील. जागोर महोत्सवात श्रीराम वाडेकरी मंडळ करमळे केरी फोंडा, श्री गुरुदेव दहाजण समाज मंडळ पिसगाळ कुर्टी, श्री हनुमान देवस्थान कुंकळय़े म्हार्दोळ, श्री सातेरी देवस्थान पाळे शिरदोण तिसवाडी, श्री कमलावती रवळनाथ देवस्थान सकलेभाट करमळी व श्री भगवती चिमुलकरीण देवस्थान समिती चिंबल तिसवाडी ही पथके जागोर सादर होणार आहे.