भारतीयांची मागावी लागली माफी
वृत्तसंस्था/ ऍडलेड
ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेडमध्ये एका पोस्ट ऑफिसबाहेर वर्णद्वेषी फलक लावण्यात आला आहे. या फलकावर भारतीय छायाचित्र काढून घेऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. या फलकाबद्दल तेथे राहणाऱया भारतीयांनी आक्षेप नेंदविला आहे. भारतीय समुदायाचे लोक याला वर्णद्वेषाशी जोडून पाहत आहेत. परंतु वाद वाढल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन पोस्टने माफी मागत हा फलक लवकरच हटवू असे सांगितले आहे.
ऍडलेडच्या रंडल मॉल भागात एका पोस्ट ऑफिसबाहेर एका फलकावर इंग्रजीत मोठय़ा आणि बोल्ड अक्षरांमध्ये ‘लाइटनिंग आणि फोटोच्या बॅकग्राउंडच्या गुणवत्तेमुळे आम्ही दुर्दैवाने भारतीयांची छायाचित्रे काढू शकत नाही’ असे नमूद करण्यात आले होते. हा प्रकार पूर्णपणे वर्णद्वेषाशी निगडित असल्याचा आरोप होत आहे. भारतीय समुदायाचे स्थानिक नेते राजेंद्र पांडे यांनी हा प्रकार माझ्या वर्णाबद्दल टिप्पणी करणारा असल्याचे म्हटले आहे.
हा प्रकार अस्वीकारार्ह
या प्रकरणी वाद वाढल्यावर ऑस्ट्रेलियाचे दूरसंचार मंत्री मिशेल रोलँड यांनी ऍडलेड पोस्ट ऑफिसबाहेरील फलकावर लिहिण्यात आलेला मजकूर अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया पोस्टला यासंबंधी कळविले असून लवकरच यासंबंधी कारवाईची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया पोस्टच्या प्रवक्त्याने बाजू मांडली आहे. हा फलक मोठय़ा संख्येत भारतीय पासपोर्ट आणि व्हिजा अर्जासोबत देण्यात आलेल्या छायाचित्रांमुळे फेटाळले जाण्याचा परिणाम आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय छायाचित्राच्या मंजुरीसाठी वेगळे नियम असून यासाठी ऑस्ट्रेलिया पोस्ट त्याचे निकष पूर्ण करण्यास सक्षम नसल्याचा युक्तिवाद या प्रवक्त्याने केला आहे.