मुख्याधिकाऱयांवर दबाव आणण्यासाठी थेट लावला शिवेंद्रराजेंना फोन
प्रतिनिधी/ सातारा
वेळ दुपारी 12 ची…मुख्याधिकारी अभिजित बापट फाईलीच ढिगाऱयात…तोच एक कार्यकर्ता दोन जणांसमवेत केबीनमध्ये एन्ट्री करतो..बापट साहेबांसमोर इमेज तयार करण्यासाठी कर्मचाऱयांना बिगारी म्हणून कामावर घेतले नाही, असे सांगत चक्क आमदार शिवेंद्रराजेंना फोन लावून देत बापटसाहेबांकडे दिला. बापट साहेबांनी विनंती करत केबीनमधून बाहेर पडले. बाहेर पडताना माझ्या अखत्यारित हा विषय येत नसल्याचे त्यास सांगताच त्या कार्यकर्त्याचा पारा आणखीच चढला. मग पायऱयातच घंटागाडी ठेकेदाराचा प्रतिनिधी दिसताच त्याच्यासमोर आकांडतांडव करत जोरदार धिंगाणा केला. आपल्या मर्जीतील कर्मचाऱयांना बिगारी म्हणून लावण्यासाठी त्याच्याकडून लकडा लावला जात आहे.
सातारा पालिकेत सध्या कर्मचारी संघटनांच्या नावाखाली अनेकजणांकडून पालिकेच्या आरोग्य विभागाला वेठीस धरणाचे काम सुरु आहे. त्यापैकीच एकजण भावी नगरसेवक होण्यासाठी इच्छूक असून त्याने पालिकेत शुक्रवारी गोंधळ घातला. पालिकेत दुपारी 12 वाजता मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या केबीनमध्ये जावून त्यांना आरोग्य विभागाचे अधिकारी 20 कर्मचाऱयांच्या वर घेणार नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर बापट यांनी स्पष्टपणे बजावले की आमचा पालिका प्रशासनाचा काही रोल नसताना आऊट ऑफ द वे जावून तुमचे काम करण्याच्या सुचना दिल्या असताना तुमच्याकडून सहकार्य होत नाही, असे सांगून ते कलेक्टर ऑफिसमध्ये मिटींगला गेले. मात्र, बापटसाहेबांच्या या उत्तरावरुन तो भावी नगरसेवक भलताच चिडला. त्यातच ठेकेदाराचा प्रतिनिधी दिसताच त्याचा आकांडतांडव सुरु केला. सत्ताधाऱयांकडून टेंडर बाहेरच्यांना दिले जाते आणि स्थानिकांवर अन्याय केला जातो. या कर्मचाऱयांना घेतले नाही ना मी तुमच्या कार्यालयात येवून आत्महत्या करेन, अशी धमकीच दिली. तो कार्यकर्ता एवढा आक्रमक झाला होता की त्याचा पाराखाली आणण्यासाठी माजी नगरसेवक धनंजय जांभळे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांनी मध्यस्थी करत शांततेत चर्चा करुन प्रश्न मिटवा, अशी विनंती केली. तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा धिंगाणा तब्बल अर्धा तास पालिकेत सुरु होता.
आपल्या मर्जीतील कर्मचाऱयांना कामावर घेण्यासाठी तगादा
घंटागाडीवर बिगारी म्हणून घेण्यासाठी भावी नगरसेवकाकडून हा घाट घातला जात असल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरु होती. दरम्यान, आरोग्य विभागावरही संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून काहीजण राजकीय दबाव आणून व माहितीच्या अधिकाराची धमकी देवून आपले पितळ साधवून घेतात, अशीही एका बाजूला चर्चा सुरु आहे.